नशीब सूरज चव्हाण आमच्या पक्षातला असं कोणी म्हणालं नाही, संजय शिरसाट यांनी कुणाला डिवचले?
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सूरज चव्हाण विजेता झाला, त्याबद्दल विचारणा करण्यात आली. यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले.
Sanjay Shirsat On Suraj Chavan : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम अशी ओळख असलेल्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा अंतिम सोहळा नुकताच पार पडला. सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला. बिग बॉस मराठीचा विजेता घोषित होताच सूरज चव्हाणवर बक्षिसांचा वर्षाव झाला. सूरज चव्हाणला 14 लाख 60 हजार इतके रुपये मिळाले. तसेच त्याला बिग बॉस मराठीच्या मानाची ट्रॉफी मिळाली. त्यासोबतच पु.ना.गाडगीळ आणि सन्स लिमिटेड तर्फे दहा लाखांचे विशेष गिफ्ट आणि Tunwal E Motors limited तर्फे बाईकही भेट म्हणून देण्यात आली. आता यावर शिंदे गटाचे नेत्याने एक मोठे वक्तव्य केले.
शिवसेना प्रवक्ते आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी विधानसभेचे जागावाटप, उमेदवार यांसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांना बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सूरज चव्हाण विजेता झाला, त्याबद्दल विचारणा करण्यात आली. यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले.
लिहिता वाचता न येणाऱ्यालाही बिग बॉस जिंकता येते
“सूरज चव्हाण हा स्वत:च्या मेहनतीवर विजेता झाला. सूरजने दाखवून दिलं आहे की लिहिता वाचता न येणाऱ्यालाही बिग बॉस जिंकता येते. नशिब तो आमच्या पक्षातला आहे, असं कोणी बोलला नाही”, असा मिश्किल टोला संजय शिरसाट यांनी लगावला.
“आता उमेदवारी जाहीर होईल, तसे बारामतीचे रॅप साँगही पाहायला मिळतील. बारामतीत जे काही घडतं, त्याचे परिणाम राज्यात पाहायला मिळतात”, असेही संजय शिरसाट यांनी म्हटले.
उर्वरित सदस्यांना १ लाखांचा चेक
दरम्यान अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी हे सदस्य बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फायनलिस्ट होतं. सूरजने ट्रॉफी जिंकत चाहत्यांना सुखद धक्का दिला. तर इंडियन आयडॉलनंतर रिएलिटी शोचा विजेता होण्याचं अभिजीत सावंतचं स्वप्न मात्र थोडक्यात हुकलं. अभिजीत बिग बॉस मराठी ५ चा उपविजेता ठरल्याने त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा रनरअप अभिजीत सावंतला पु.ना. गाडगीळ यांच्याकडून 1 लाख रूपयांचा चेक देण्यात आला आहे. तर धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी यांना प्रत्येकी एक लाख रूपये देण्यात आले आहेत.