सांगलीच्या जागेवरचा तेढ वाढला; चंद्रहार पाटील-संजय राऊत तातडीने मुंबईला रवाना
Thackeray Group Leader Sanjay Raut on Sangali Loksabha Election 2024 : सकाळीच काँगेस हायकमांडशी बोलणं झालं...; सांगलीत मविआचा उमेदवार कोण? सांगलीच्या जागेवरचा तेढ कधी सुटणार?, संजय राऊतांचं मोठं विधान... काय म्हणाले? वाचा सविस्तर...
सांगलीच्या जागेवरचा तेढ कधी सुटणार?, मविआचा उमेदवार कोण? याची चर्चा सांगलीसह राज्याच्या राजकीय वर्तुळात होत आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि संजय राऊत सांगलीहून मुंबईसाठी रवाना झाले आहेत. चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी राऊत सांगलीत गेले होते. आता संजय राऊत यांच्यासोबत चंद्रहार पाटील हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना झाले आहेत. शिवसेना काही उमेदवारांची बैठक आणि सांगली-कोल्हापूरवासीयांची बैठक असल्याने चंद्रहार पाटील मुंबईला येत असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
सांगलीच्या जागेवर संजय राऊत म्हणाले…
आज सकाळीच काँगेस हायकमांडशी बोलणं झालं आहे. त्यामुळे चंद्रहार पाटील हेच उमेदवार असतील, हे जबाबदारीने बोलतो आहे. शेवटपर्यंत आघाडीमध्ये पेच आहे. पण एकमेकांशी चर्चा करून तो सोडवला जाईल. काही ठिकाणी शिवसेना, काही ठिकाणी काँग्रेस लढण्यासाठी आग्रह आहे. पण वरिष्ठ पातळीवरून कार्यकर्त्यांना सांगायचं असतं. त्यामुळे सगळ्या पक्षाचे नेते मिळून याबाबत निर्णय घेतील, असं संजय राऊत म्हणाले.
मैत्रिपूर्ण लढतीवर राऊत म्हणाले…
मैत्रिपूर्ण लढतीबाबत बोलणारे अनिस अहमद कोण? मैत्रिपूर्ण लढतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. मैत्रिपूर्ण लढत ही घातक आहे, मग सगळीकडेच मैत्रिपूर्ण लढत होईल. नाना पाटोले बोलत असतील तर चांगली गोष्ट आहे. गिरीश महाजन जळगाव वाचवा. त्यांची जागा दाखवण्यासाठी आम्ही शिवसेना उमेदवार उभा केला आहे, असं संजय राऊत म्हणाले.
एकनाथ खडसे भाजपत जाणार?; संजय राऊत म्हणाले…
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपत घरवापसी करणार आहेत. लवकरच त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. याबाबत संजय राऊत यांना सांगलीत विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी यावर उत्तर दिलं आहे. एकनाथ खडसे भाजपात जाणार आहेत, याबाबत मला माहिती नाही. पण भाजपने त्यांच्यावर जे आरोप केले आहेत. त्याचं काय? आता त्यांच्याकडे वेगळी वाशिंग मशीन आली आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.