एकनाथ शिंदे यांचा मोदी, शाह यांच्याकडे पत्ता कट?; संजय राऊत म्हणाले, ते आता ‘लाडके भाऊ’…
नोव्हेंबर आता संपेल नंतर डिसेंबर उजाडेल. त्यानंतर ५ तारीख येईल. तोपर्यंत आमचे काळजीवाहू मुख्यमंत्री काय करतील याचा काहीही भरोसा नाही, असे संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut On Eknath Shinde : “काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा पडलेला आहे. ते सतत लाडका भाऊ बडबडत आहेत. पण आता ते मोदी, शाहांचे लाडके भाऊ राहिलेले नाहीत. देवेंद्र फडणवीसांचेही लाडके भाऊ दिसत नाहीत. त्यांना उपचारांची गरज आहे”, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला. ते मुंबईत बोलत होते.
भाजपसह महायुतीवर जोरदार टीका
संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महाराष्ट्रातील सत्तास्थापना, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. यावेळी त्यांनी भाजपसह महायुतीवर जोरदार टीका केली.
काळजीवाहू मुख्यमंत्री काय करतील याचा नेम नाही
“गेल्या अनेक दिवसांपासून फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी माहिती समोर येत आहे. पहिल्या दिवसापासून हे सुरु आहे. पण तो दिवस सूर्य अजून उजाडत नाही. अजून हा महिना संपायचा आहे. नोव्हेंबर आता संपेल नंतर डिसेंबर उजाडेल. त्यानंतर ५ तारीख येईल. तोपर्यंत आमचे काळजीवाहू मुख्यमंत्री काय करतील याचा काहीही भरोसा नाही”, असे संजय राऊत म्हणाले.
ते मनाने खचलेले
“माझ्या माहितीप्रमाणे ते मनाने खचलेले आहेत. ते अस्वस्थ आहेत. त्यांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडलेले आहे. त्याला जबाबदार कोण, त्यांच्या प्रकृती का बिघडली, कोणामुळे बिघडली. त्यांना शब्द देऊन कोणी तो शब्द फिरवला आहे का, असे अनेक मुद्दे सध्या चर्चेत आहेत. त्यांचा चेहरा पडलेला आहे. ते हसत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर हसू मावळलेले आहे. त्यांच्या डोळ्यात चमक दिसत नाहीत”, असेही संजय राऊतांनी म्हटले.
“ते फक्त मी लाडका भाऊ मी लाडका भाऊ इतकंच बडबडत आहेत, पण आता ते मोदी, शाहांचे लाडके भाऊ राहिलेले नाहीत. देवेंद्र फडणवीसांचेही लाडके भाऊ दिसत नाहीत. ते सतत लाडका भाऊ बडबडतात. त्यांना उपचारांची गरज आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार करायला हवे. कारण भाजपने विषवल्ली आहे. नाग आहे. आम्हाला ही अशाचप्रकारे डंक मारतात. त्यांच्याबरोबर जे जातात त्यांना ते असाच डंक मारतात. हा अनुभव आहे. महाराष्ट्राला विषारी नागांचा विळखा पडलेला आहे. तो लोकशाही मार्गाने कसा सोडवायचा हे आम्ही पाहू”, असेही संजय राऊत म्हणाले.