“सहा महिन्यात पंतप्रधान मोदींचे सरकार पडणार”, महाविकासआघाडीतील नेत्याची भविष्यवाणी, चर्चांना उधाण
भाजप हा जाहिरातीवर तारलेला पक्ष आहे. जाहिरातबाजीवर खर्च करुन २०१४ साली नरेंद्र मोदी सत्तेवर आले. खोट्या जाहिराती, खोटी प्रसिद्धी हे सर्व त्यावेळी केलं, असेही ते म्हणाले.
Sanjay Raut On PM Modi government : राज्यात विधानसभा निवडणुकांची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महाराष्ट्रात मतदानासाठी फक्त ६ दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडत आहेत. सध्या प्रचाराच्या तोफा गाजताना दिसत आहे. महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळत आहे. त्यातच आता महाविकासआघाडीतील एका नेत्याने मोठी भविष्यवाणी केली आहे. येत्या सहा महिन्यात केंद्रातील मोदींचे सरकार पडणार, असे विधान या नेत्याने केले आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहांना महाराष्ट्र भीक घालत नाही. महाराष्ट्रातील निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपचा पराभव होणार आहे. राज्यात महाविकासआघाडीचं सरकार येताच पुढच्या सहा महिन्यात नरेंद्र मोदींचे सरकार डळमळीत होईल”, असे विधान ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊतांनी केले. नुकतंच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
जाहिरातबाजीवर खर्च करुन मोदी सत्तेत
“भाजप हा जाहिरातीवर तारलेला पक्ष आहे. जाहिरातबाजीवर खर्च करुन २०१४ साली नरेंद्र मोदी सत्तेवर आले. खोट्या जाहिराती, खोटी प्रसिद्धी हे सर्व त्यावेळी केलं. २०१४ मध्ये ब्लॅक अँड व्हाईटमध्ये जाहिराती केल्या होत्या. आता १० वर्षांनी आपण जर पाहिलं, तर त्यांनी फार मोठी क्रांती केली किंवा त्यांनी आधुनिक हिंदुस्थान घडवलाय, असं काही वाटत नाही”, अशा शब्दात संजय राऊतांनी टीका केली.
मोदींनी भारत देशाला मागे ओढण्याचे काम केले
“पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत देशाला मागे ओढण्याचे काम केले आहे. मोदींनी नवीन काहीही केलं नाही. शिवतीर्थावर ते सभा घेत आहेत. पंतप्रधान मोदींनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीला स्मरुन सांगावं की महाराष्ट्र तोडण्यासाठी मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी त्यांनी शिवसेना तोडली की नाही? हे त्यांनी त्यांच्या छातीवर हात ठेवून सांगावं. त्यांच्यात तेवढी हिंमत असेल तर आम्ही पाहू”, असे ओपन चॅलेंजही संजय राऊतांनी दिले.
“मोदी येतील आणि जातील. मोदी उद्या ब्राझीलला जातात. त्यानंतर ते आणखी दोन देशात जाणार आहेत हा आधुनिक हिंदुस्थानाचा शिल्पकार या देशात असतो का? एकतर तो प्रचारात असतो. कोणतीही निवडणूक असली तर भाजपवाले त्यांना प्रचारात उतरवतात. नाहीतर ते जागतिक दौऱ्यावर असतात. जगात फिरत असतात”, अशा शब्दात संजय राऊतांनी घणाघात केला.
नरेंद्र मोदींचे सरकार डळमळीत होईल
“मोदी-शहांना महाराष्ट्र भीक घालत नाही. महाराष्ट्रातील निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपचा पराभव होणार आहे. राज्यात महाविकासआघाडीचं सरकार येताच पुढच्या सहा महिन्यात नरेंद्र मोदींचे सरकार डळमळीत होईल. संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्रातील निवडणुकांकडे लागलं आहे. त्यामुळेच नरेंद्र मोदी, अमित शाहा यांसह त्यांचे केंद्रीय मंत्रिमंडळ हे संपूर्ण राज्यात फिरतंय. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यात सरकार निवडून येणार आहे”, असे संजय राऊत म्हणाले.