उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का?; संजय राऊत यांची हिंट काय?
त्यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य केले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भाऊ आहेत, त्यांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्र मान्य करेल, असे संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात राजकारणात नेहमीच काही ना काही घडामोडी घडत असतात. त्यातच राज्याच्या राजकारणात ठाकरे कुटुंबाची कायमच चर्चा पाहायला मिळते. गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रातील मराठी माणसाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावे, असे वाटत आहे. त्यातच काल एक मोठी घडामोड घडली. राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचा लग्न सोहळ्यानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे या दोघांमध्ये संवादही झाला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कौटुंबिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आल्याने मराठी माणूस सुखावला अशी प्रतिक्रिया सध्या उमटत आहे. त्यातच आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक वक्तव्य केले आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आता संजय राऊत यांनी या भेटीबद्दल एक महत्त्वाची हिंट दिली आहे. संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य केले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भाऊ आहेत, त्यांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्र मान्य करेल, असे संजय राऊत म्हणाले.
गेल्या अनेक वर्षांपासून ही चर्चा सुरु आहे. त्या चर्चेत माझ्यासारखा माणूस देखील सहभागी असतो. राज ठाकरे यांच्यासोबत देखील मी काम केले आहे. त्यांच्या कुटुंबासोबत मित्रत्वाचं नातं राहील आहे. उद्धव ठाकरे हे देखील माझ्या भाऊ आणि मित्राप्रमाणे आहे. काल ते एकत्र आले याचा नक्कीच आनंद आहे. महाराष्ट्राचे ठाकरे कुटुंबावर जीवापाड प्रेम आहे, असे संजय राऊतांनी म्हटले.
त्या दोघांचे पक्ष वेगवेगळे आहेत. राज ठाकरे हे भाजपच्या सोबत राहून काम करतात. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा हे त्यांचे आयडॉल आहेत. आमच्या पक्षाचं तसं नाही. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. त्यांच्याबरोबर आम्हाला काम करता येणार नाही. महाराष्ट्र लुटण्यामध्ये मराठी माणसावर अन्याय करण्यामध्ये शिवसेना फोडण्यामध्ये या तिघांचा फार मोठा सहभाग आहे. अशा व्यक्तीसोबत जाणं, ही महाराष्ट्राशी बेईमानी ठरेल, असे संजय राऊत म्हणाले.
राज ठाकरे हे अशा लोकांची भलाभल करतात. एकेकाळी आम्ही देखील भाजप सोबत राहिलो. हे एक वैचारिक मतभेदाचे दोन वेगळे प्रवाह आहे. पण कुटुंब एकत्र असतं. अजित पवार, शरद पवार, रोहित पवार हे एकत्र भेटतात ना? पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे वेगळ्या पक्षात असले तरीही भाऊ म्हणून एकत्र येतात. कोकणातले राणे त्यांचा एक मुलगा इकडे तर एक मुलगा तिकडे कुटुंब एक असतं. कुटुंब एकत्र आल्यावर महाराष्ट्राच्या दृष्टीने जे प्रवाह असतात. त्या प्रवाहात आम्हाला वाहत जाता येत नाही. हा सुद्धा विचार महाराष्ट्राने केला पाहिजे. काय निर्णय घ्यायचा हे उद्धव आणि राज ठाकरे भाऊ आहेत त्यांनी घ्यायचा त्यांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्र मान्य करेल, असे संजय राऊतांनी म्हटले.