“एकनाथ शिंदेकडून शिवसेना नावाला कलंक”, संजय राऊतांचा घणाघात, म्हणाले “स्वतःला डुप्लिकेट शिवसेनाप्रमुख…”
शिवसेना चोरणारे, स्वतःला शिवसेना डुप्लिकेट प्रमुख म्हणवणारे मुख्यमंत्री गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत आहेत. ते केंद्रीत गृहमंत्री अमित शहा यांच्या दरवाजात बसले आहेत. हे महाराष्ट्राला शोभणारे नाही, असे संजय राऊत म्हणाले.
Maharashtra Assembly Elections 2024 : “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना नावाला कलंक लावत आहेत. एक काळ होता की जेव्हा भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे मुंबईत मातोश्रीवर येऊन चर्चा करत होते. मात्र, सध्याचे चित्र उलट असून मोठे गंमतीशीर आहे. एकनाथ शिंदे गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत आहेत. काय होणार, कधी होणार याची त्यांना माहितीही नाही”, अशा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला.
“शिवसेना नावाला कलंक लावतात”
संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकासआघाडीतील जागावाटपासह वरळी विधानसभा, शिवडी विधानसभेतील तिढा याबद्दल भाष्य केले. यावेळी एकनाथ शिंदेंनी महायुतीतील जागावाटपावरही भाष्य केले.
“स्वतःला शिवसेना म्हणवून घेणारे दिल्लीत जाऊन उठाबशा काढत आहेत. शिवसेनेने हे कधीही केलेले नाही. जागावाटपासाठी किंवा कोणताही निर्णय घेण्यासाठी आम्ही कधीही दिल्लीत गेलो नाही. शिवसेना चोरणारे, स्वतःला शिवसेना डुप्लिकेट प्रमुख म्हणवणारे मुख्यमंत्री गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत आहेत. ते केंद्रीत गृहमंत्री अमित शहा यांच्या दरवाजात बसले आहेत. हे महाराष्ट्राला शोभणारे नाही. असे करून ते शिवसेना या नावाला कलंक लावत आहेत”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
दिल्लीत चारपाच दिवस ताटकळत बसलेत
“एक काळ होता की, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे मुंबईत मातोश्रीवर येऊन चर्चा करत होते. मात्र, सध्याचे चित्र उलट असून मोठे गंमतीशीर आहे. ते दिल्लीत चारपाच दिवस ताटकळत बसले आहेत. जागावाटप कधी होणार, काय होणार हे त्यांनाही माहिती नाही”, असेही संजय राऊत म्हणाले.
“महाविकासआघाडीत मतभेद नाही”
“महाविकासआघाडीत आता कोणतेही मतभेद नाहीत. आमचे जागावाटप झाले असून सर्व ठरले आहेत. काही जागांवर उमेदवारांची अदलाबदली किंवा काही बदल होण्याची शक्यता आहे. सर्व चित्र सोमवारपर्यंत स्पष्ट होईल. मित्रपक्षही आमच्यासोबत आहेत. कोणताही मित्रपक्ष नाराज होणार नाही, एवढ्या जागा त्यांना सोडण्यात येणार आहेत”, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
सुधीर साळवी नाराज नाहीत
“सुधीर साळवी यांची शिवसेनेपेक्षा एक वेगळी ओळख आहे. शिवडी विधानसभा मतदारसंघात अजय चौधरींना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सुधीर साळवी रागवलेत असं मला तरी वाटत नाही. स्थानिकांची मागण्याची आमच्यापर्यंत आलेली नाही. ती तुमच्यापर्यंत आली असेल. शिवसेनेत कुठेही बंडखोऱ्या होणार नाहीत”, असे संजय राऊत म्हणाले.