Sanjay Raut : म्हणजे ते बोगस शिवसैनिक होते – एकनाथ शिंदेंच्या त्या वक्तव्यानंतर राऊतांचा घणाघात
आजच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून महायुतीमधील आमदाराचं बौद्धिक घेण्यात येणार असून त्यासाठी भाजपचे नेते, कार्यकर्ते यांच्यासह शिवसेनेचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित आहेत. याच मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेवर टीका करत घणाघाती हल्ला चढव
नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. दरम्यान आजच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून महायुतीमधील आमदाराचं बौद्धिक घेण्यात येणार असून त्यासाठी भाजपचे नेते, कार्यकर्ते यांच्यासह शिवसेनेचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित आहेत. याच मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेवर टीका करत घणाघाती हल्ला चढवला. दुसऱ्यांकडून बौद्धिक घ्यावीत आणि आपला पक्ष चालवावा, एवढी भीक आम्हाला कधीच लागली नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे कधीच त्या वाटेने गेले नाहीत असं म्हणत त्यांनी शिंदेंवर टीका केली. त्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्षा विलीन केला पाहिजे आणि मोक्ष घेतला पाहिजे असा टोलाही राऊत यांनी हाणला.
मी लहानपणापासून स्वयंसेवक आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले, त्यावरही राऊतांनी खोचक टीका केली. बापरे ! ही ऐतिहासिक गोष्ट आहे, त्याच्यावर संशोधन होणं गरजेचं आहे. ते लहानपणापासून (संघाचे) स्वयंसेवक असतील तर ते शिवसैनिक कधी झाले ? याचा अर्थ ते शिवसैनिक नव्हते, याचा अर्थ ते बोगस शिवसैनिक होते, हे आता त्यांनी त्यांच्या तोंडाने उघड केलं आहे.
आम्ही जन्मत:च शिवसैनिक आहोत, आम्ही फक्त शिवसेनेच्या शाखेत गेलो आणि जनतेची कामं करत राहिलो. आणि आमचे सेनापती मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हेच होते, असे राऊत म्हणाले.
काय म्हणाले संजय राऊत ?
भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा संबंध असू शकेल, पण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थाप केलेल्या शिवसेनेचा संबंध कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आला नाही,बाळासाहेब ठाकरेंनी येऊ दिला नाही. त्यांना अनेकदा दसऱ्याच्या मेळाव्यासाठी आमंत्रित करण्यात आलं , शिवसेना प्रमुख कधीही त्या वाटेनं गेले नाहीत. त्यांचं हिंदुत्व वेगळ्याच पद्धतीचं होतं, हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व, ही भूमिका बाळासाहेब यांनी घेतली होती. दुसऱ्या एखाद्या संघटनेचं मांडलिक व्हावं आणि त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांच्याकडून बौद्धिक घ्यावं एवढी कंगाल शिवसेना बाळासाहेबांनी कधीच केली नव्हती, असं राऊत म्हणाले.
ही लाचारी आहे. सत्तेत राहण्यासाठी, सत्ता टिकवण्यासाठी , ईडी, सीबीआयची भीती आहे, त्यापासून मुक्त होण्यासाठी हे सगळे लोकं ( एकनाथ शिंद आणि इतर) तिथे शेकोटीला गेले आहेत, असे टीकास्त्र राऊतांनी सोडले.
त्यांचं ब्रेनवॉश झालंय
शिवसेना हा स्वतंत्र राजकीय पक्ष आणि संघटन आहे. आमचा कारभार स्वतंत्र आहे. काही सरसंघचालकांसोहत शिवसेनाप्रमुखांचे मधुर संबंध होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतंत्र आहे, त्यांचं काम, संघटना स्वतंत्र आहे, मोदी, शाह, हे त्यांच्या संघटनेचे सदस्या आहेत. पण शिवसेना त्यांची सदस्य नाही. त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करत राहू. त्यांनी त्यांची संघटना वाढवली, आम्ही आमचा पक्ष आणि संघटना वाढवली. प्रखर राष्ट्रवाद हाच आमचा हिंदुत्ववाद राहिला आहे. पण स्वत:ला शिवसेना म्हणून घेणारे (एकनाथ शिंदे) भजन-कीर्तन करत नागपूरच्या विधानसभेतून रेशीमबागेत जात असतील तर याचा अर्थ असा की तुम्ही स्वतंत्र राहिलेले नाही, तुमच्यावर नियंत्रण आहे. त्याचं ब्रेनवॉश पूर्णपणे झालेलं आहे, हे स्पष्ट आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली. आणीबाणी सारख्या कठीण प्रसंगी शिवसेनेने काँग्रेस मधे विलीन व्हाव असा दबाव होता मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी ती मागणी फेटाळून लावल्याचेही राऊतांनी नमूद केलं.