अजित पवार हे अॅक्सिडेंटल नेते, संजय राऊत यांनी उडवली खिल्ली; काय काय म्हणाले ?
बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. भाजप आमदारांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले असून, विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अजित पवार यांनी मुंडे यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे, तर संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून राजकारण तापलं असून याप्रकरणी धनंजय मुंडेंचा राजीनामा विरोधक सातत्याने मागत आहेत. या हत्या प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभी आरोप केले आहेत. विरोधकांनी राज्यपालांकडे तक्रार करून मुंडेच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याचडरम्यान धनंजय मुंडे यांनी काल अजित पवारांची भेट घेतली होती. मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावा नाही, तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई नाही, असं अजित पवार यांच म्हणणं असून त्यांनी एका प्रकारे धनंजय मुंडेंना अभयच दिलं आहे, अशी चर्चा आहे. याच मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांची खिल्ली उडवत त्यांच्यावर टीकाही केली आहे.
अजित पवार ॲक्सिडेंटल नेते
अजित पवार हे हतबल आहेत, ते नेते नाहीत. अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत असा टोला राऊतांनी लगावला, भारतीय जनता पक्षाच्या ईव्हीएमच्या कृपेने त्यांना ( निवडणुकीत) जागा मिळाल्या आहेत, स्वत:च्या कर्तृत्वावर नव्हे. ते जर महाराष्ट्राचे नेत असते तर त्यांनी बीड प्रकरणातील त्या मंत्र्याला आपल्या मंत्रीमंडळातून वगळलं असतं, त्यांना आता आणखी कोणते पुरावे हवे आहेत असा हल्ला राऊत यांनी चढवला.
नाहीतर तुमच्या हातून हे राज्य निसटेल
त्यांच्या सरकारने आम्हाला सगळ्यांना पुराव्याशिवाय तुरूंगात टाकलं होतं, तेव्हा अजित पवार काही बोलले नाहीत. मग आता ते कसल्या पुराव्याच्या गोष्टी करत आहेत ? आम्हाला गाडायचं आणि त्यांना पुरावा शोधायचा. बीडमध्ये लोकांना फसवण्याचा खेळ चाललेला आहे.ज्या पद्धतीने आरोपी, पोलीस , राजकारणी यांचे जेवणाचे, बैठकीचे फोटो समोर येत आहेत. बीडमधील संतोष देशमुख प्रकरणाचा आणि माफियागिरीच्या तपासाचा जो फार्स चालू आहे . देवेंद्र फडणवीस यांना माझं आव्हान आहे, भाजप ज्या पद्धतीने आपल्या माफिया मित्रपक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं माफियाकरण होईल असा हल्ला राऊत यांनी चढवला. बीड पॅटर्न महाराष्ट्रात लागू झाला, तर प्रत्येक राज्यात हाच पॅटर्न लागू होईल आणि तुमच्या हातातून हे राज्य निसटून जाईल असा इशाराही राऊतांनी दिला.
बीडमधलं संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे, तेथील संतोष देशमुख हत्येचा खटला हा पूर्णपणे बीडच्या बाहेरच चालवला पाहिजे अशी मागणी राऊतांनी पुन्हा केली. तसेच एसआयटीमधल्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याची चौकशी केली पाहिजे, असंही ते म्हणाले.
आखाडा म्हटलं की एकमेकांचे कपडे फाडणं, चिखलफेक करणं, एकमेकांना संपवण्याची भाषा करणं हे सुरू आहे. आमच्या सगळ्यांचा राजकीय शत्रू म्हणजे भाजप, जो देशाच्या लोकशाहीच्या मुळावर आला आहे. एकीचं चित्र दिल्लीत दिसत नाही. भाजचा पराभव करण्यासाठी आपापसातले मतभेद विसरून एकत्र येणं गरजेच आहे, असंही राऊत यांनी नमूद केलं.