राज साहेब… गेट वेल सून… मला आपली काळजी वाटते; ठाकरे गटाच्या महिला नेत्याची बोचरी टीका
निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. एकमेकांवर चांगलंच तोंडसुख घेतलं जात आहे. सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यात चांगलीच जुंपली आहेत. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचा सुषमा अंधारे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरे हे इतिहासाताच रमतात. त्यातून ते बाहेर पडत नाहीत. कधी तरी वास्तवात या, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला होता. राज ठाकरे यांच्या या टीकेचा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी समाचार घेतला आहे. राज ठाकरे हे निवडणुका आल्या म्हणून बोलत आहेत. निवडणुका झाल्यावर पुढचे साडेचार वर्ष ते शीतनिद्रेत जाणार आहेत, असा टोला लगावतनाच राज साहेब, गेट वेल सून. मला तुमची काळजी वाटतेय, असा चिमटाही सुषमा अंधारे यांनी काढला आहे. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या.
सजीव सृष्टीमध्ये अनेक वेगवेगळे जीव आहेत. यात काही हायबरनेटिव्ह प्रकारचे काही प्राणी असतात. जे हायबरनेशनमध्ये 8-9 महिन्यांचा कालावधी घालवतात. आणि जेव्हा त्यांना अनुकूल ऋतू येतो, तेव्हा ते बाहेर पडतात. त्यांची उपजीविका आणि इतर काही गोष्टी शोधतात. राजकारणात सुद्धा असे काही राजकीय सस्तन प्राणी आहेत. जे चार साडेचार वर्षे एका कोषामध्ये जातात आणि निवडणुकांचा हंगाम आला की ते बाहेर पडतात. बाहेर पडून आपण वेगळ्याचं ध्रुवावरून आलेलो आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. अशांपैकी एक म्हणजे राज ठाकरे साहेब, अशी बोचरी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.
मला त्यांची काळजी वाटते
आज ते इतिहासाबद्दल बोलत होते. त्यांना धारावी म्हणजे इतिहास वाटतोय का? धारावीतली माणसे म्हणजे त्यांना हडप्पा मोहंजोदडोमध्ये गडप झालेली संस्कृती वाटते. सध्या ते कशाही प्रकारची विधाने करत आहेत. बोलतात बोलतात आणि म्हणतात माझ्या हातात सत्ता द्या. सत्ता द्यायला पण काही हरकत नाही, पण पुढचे चार साडेचार वर्ष पुन्हा ते हायबरनेशनमध्ये गेले तर ती साडेचार वर्ष कोणाच्या भरवशावर काढायची?.. हा एक वेगळाच प्रश्न, असा चिमटा काढतानाच राज साहेब गेटवेल सून.. मला आपली काळजी आहे. एवढेच मी त्यांना सांगेन, असा टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
गोरेगावाच्या नेस्को सेंटरमध्ये काल मनसेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे हे इतिहासातून बाहेरच येत नाही. सारखी वाघनखं काढतो, इथून अब्दाली आला, तिथून अफजलाखान आला, तिकडून शाहिस्तेखान आला, अरे महाराष्ट्राबद्दल बोल, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती.