“राज ठाकरेंनी शिवाजी पार्कात कॅफे खोलला, लोक चहापाण्याला येतात”; संजय राऊत यांचा खोचक टोला
राज ठाकरे हे भाजपाच्या विरोधात बोलतात मात्र निवडणुका जवळ आल्या की ते प्रो भाजप होतात, अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केली.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील सर्वच पक्ष महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. त्यातच आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘शिवतीर्था’वर दाखल झाले. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजप नेते मोहित कंबोजही उपस्थित आहेत. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात गेल्या तासाभरापासून चर्चा सुरु आहे. या भेटीमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विधानसभा निवडणुका आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत, त्यामुळे या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. आता या भेटीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली.
संजय राऊतांचा टोला
संजय राऊतांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राज ठाकरेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये कॅफे खोलला आहे. तिथे लोक चहापाणी करायला येतात, असे संजय राऊत म्हणाले. चांगला चहा असेल तर लोक येत असतात, असेही संजय राऊतांनी म्हटले.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे यांच्या भेटीवर टीका केली. राज ठाकरे यांचा पॉलिटिकल रिलेव्हन्स संपत चाललेला आहे. त्यामुळे राज ठाकरे काय बोलतात आणि त्यांच्याकडे कोण जातं यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात फार काही उलथापालथ होणार नाही, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
महाराष्ट्राच्या जनतेलाच काय पण मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पण ही गोष्ट यूज टू झालेली आहे. राज ठाकरे हे भाजपाच्या विरोधात बोलतात मात्र निवडणुका जवळ आल्या की ते प्रो भाजप होतात, अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केली.
नियोजित भेट नाही
देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात राजकीय चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. देवेंद्र फडणवीस हे आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी एका कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमापूर्वी देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. ही भेट नियोजित नसल्याचे बोललं जात आहे.