कोकणात ठाकरे गटाला मोठे खिंडार, राजन साळवींसह दोन माजी आमदारांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
आता रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. उद्धव ठाकरे गटाचे दोन माजी आमदार शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राजन साळवी यांनी नुकतंच एकनाथ शिंदेना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी त्यांनी पक्षप्रवेशाची तारीख निश्चित केल्याचे बोललं जात आहे.
राजन साळवी हे ठाकरे गटाचे कोकणातील मोठे आणि महत्त्वाचे नेते आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी राजन साळवींनी 10 तारखेऐवजी १३ तारखेला प्रवेश करण्यासंदर्भात चर्चा केल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
राजन साळवींकडून शिंदे गटात प्रवेशाच्या अफवा
काही दिवसांपूर्वी राजन साळवी यांनी शिवसेना प्रवेशाच्या बातम्या चुकीच्या असल्याचे म्हटलं होतं. “मी नाराज आहे, भाजपच्या वाटेवर आहे हे मला तुमच्या माध्यमातून समजतय. पण या सर्व अफवा आहेत. मी निष्ठावंत सैनिक आहे. बाळासाहेबांचाच सैनिक राहणार. या बाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही” असं राजन साळवी म्हणाले होते.
दोन माजी आमदार करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
तर दुसरीकडे आता रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. उद्धव ठाकरे गटाचे दोन माजी आमदार शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम हे लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे सुभाष बने आणि गणपत कदम यांनी काल ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
एकनाथ शिंदे हे येत्या 15 फेब्रुवारी रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी सुभाष बने आणि गणपत कदम यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे बोललं जात आहे. त्यांच्यासोबतच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने देखील मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेणार आहेत. सुभाष बने यांची संगमेश्वर, चिपळूण आणि लांजा तालुक्यातल्या काही भागात ताकद आहे. तर गणपत कदम हे राजापूर – लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. यामुळे ठाकरे गटाला मोठे खिंडार पडणार आहे.