Sanjay Raut : खरे शिवसैनिक हे.. राजन साळवींच्या भाजपाप्रवेशावरून संजय राऊत स्पष्टच बोलले
ठाकरे गटात अस्वस्थता असून अनेक पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचीही चर्चा सुरू आहे. याच मुद्यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं.
नववर्षात उद्धव ठाकरे यांच्या गटाला खिंडार पडणार असून ठाकरे यांचे कोकणातील विश्वासू मानले जाणारे नेते राजन साळवी हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. एवढंच नव्हे तर पुण्यातील ठाकरे गटाचे पाच माजी नगरसेवकही भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. ठाकरे गटात अस्वस्थता असून अनेक पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचीही चर्चा सुरू आहे. याच मुद्यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं.
शिंदे कोणत्या वाटेवर ते पहा ना आधी. स्वत: एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोकं हे अस्थिर आणि अस्वस्थ आहेत. ज्या प्रकारचं सरकार स्थापन झालंय त्यामुळे शिंदे अस्वस्थ आहेत. अशा अस्थिर आणि अस्वस्थ पक्षाकडे खरे शिवसैनिक जातील का ? असा सवाल विचारत ठाकरे गटात कोणतीही अस्वस्थता नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. आमिषं दाखवली जात आहे, सत्तेचा धाक दाखवला जातोय हे खरं आहे. जे कमजोर हृदयाचे आहेत, त्यांच्याविषयी मला बोलायचं नाहीये, पण शिवसेनेत अजूनही खंबीर मनाचे आणि मनगटाचे लोक काम करत आहेत. नवीन कार्यकर्ते तयार करायचा कारखाना आहे शिवसेना, आम्ही ( कार्यकर्ते) तयार करायचे आणि मग भाजपने किंवा इतर पक्षांनी ते घ्यायचे, हा गेल्या 50 वर्षांचा ठेकाच आहे, असे म्हणत राऊतांनी शिवसेना सोडून इतर पक्षांत भाजपात गेलेल्या नेत्यांना टोला हाणला.
शिवसेनेची बस रिकामी होत नाही
याचा अर्थ शिवसेनेची बस रिकामी होते असा नाही. पुढल्या दारातून उतरले की मागच्या दारातून लोकं परत चढतात, आमची बस भरलेलीच आहे. राजन साळवींशी माझी चर्चा झालेली आहे. पराभवानंतर ते थोडे अस्वस्थ आहेत, राज्यात आमचा जो पराभव झाला त्याची कारणं आम्ही शोधतो आहोतच. राजकीय जीवनामध्ये एखादा पराभव वाट्याला येतो, तो जर पचवायची हिंमत नसेल तर त्याने स्वत:ला बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक मानू नये, असे राऊत म्हणाले.
ही बातमी अपडेट होत आहे.