बदलापूर प्रकरणाची कोर्टाने घेतलेली दखल राजकारणाने प्रेरित आहे काय?; उद्धव ठाकरे यांचा सवाल
महाविकास आघाडीने उद्या बंद पुकारला आहे. बदलापूरच्या घटनेचा निषेध म्हणून हा बंद पुकारण्यात आला आहे. पण हा बंद राजकारणाने प्रेरित असल्याची टीका होत आहे. या टीकेचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. कोर्टाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली, ते काय होतं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
बदलापूर प्रकरणाचा निषेध म्हणून उद्या महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मात्र या बंदवरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. विरोधक बदलापूरच्या घटनेचं राजकारण करत आहेत. लाडकी बहीण योजनेला बदनाम करण्यासाठीच हा प्रयत्न सुरू आहे. उद्याचा बंद हा राजकारणाने प्रेरित आहे, अशी टीका सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांच्या या टीकेचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. उद्याचा बंद राजकारणाने प्रेरित आहे, असं म्हणता तर मग हायकोर्टाने या प्रकरणाची स्वत:हून घेतलेली दखल ही सुद्धा राजकारणाने प्रेरित आहे काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बंदची रुपरेषा मांडली. बंद दरम्यान काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याची माहितीही दिली. तसेच बंदवरून होत असलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. याशिवाय सर्वच वर्गातील लोकांना या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केलं. तसेच हा बंद राजकीय हेतूने प्रेरित नाहीये. हा बंद म्हणजे विकृती विरुद्ध संस्कृती आहे. या बंदचं यश अपयश राजकारणात मोजू नका. विकृती विरुद्ध संस्कृती यातच बंदचं यश अपयश मोजा, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
कोर्टाने थोबडवलं ते..
हा बंद राजकारणाने प्रेरित असल्याचं काही लोक म्हणत आहेत. मग उच्च न्यायालाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली आहे. ती काय राजकारणाने प्रेरित आहे का? काल कोर्टाने या प्रकरणात राज्य सरकारला थोबडवलं आहे, ते थोबडवणंही राजकारणाने प्रेरित होतं का? जर कोर्टच या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत असेल तर जनतेलाही सरकारला जाब विचारता येईल ना. त्यांनाही या प्रकरणाचा निषेध नोंदवता येईल ना, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
तर उद्रेक झाला नसता
केवळ निवडणुकांच्या काळातच लोकांनी मत व्यक्त केलं पाहिजे असं काही नाही. एखादी घटना जर घडत असेल, असुरक्षितता वाटत असेल तर लोक व्यक्त होऊ शकतात. त्यांनी मधल्या काळातही बोललं पाहिजे. बदलापूरच्या प्रकरणात यंत्रणांनी चांगलं काम केलं असतं तर हा उद्रेकच झाला नसता, असं सांगतानाच जनतेचं न्यायालय वेगळं आहे. आता जनतेच्या न्यायालयाचा दरवाजा उघडत आहे. यंत्रणांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव होण्यासाठीच हा दरवाजा उघडला जात आहे, म्हणूनच उद्या बंद पुकारला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यश-अपयश मोजू नका
उद्याचा बंद फक्त दुपारी 2 वाजेपर्यंत असेल. त्यामुळे व्यापारी वर्गाचं नुकसान होणार नाही. बसेस आणि रेल्वेही बंद ठेवली पाहिजे. उद्याचा बंद हा जनतेची भावना व्यक्त करणारा आहे. त्याचं यश अपयश हे राजकारणात मोजू नका. बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती विरुद्ध असेल. त्यामुळे त्याचं यश अपयश हे विकृती विरुद्ध संस्कृती असं असेल, असंही ते म्हणाले.