मंत्रिपद भोगून फितुरी करणाऱ्यांचा पाडाव करा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव न घेता त्यांनी (NCP Jayant Patil) कडाडून टीका केली.
उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातबारा उताऱ्यावर ज्यांचं नाव लिहिलेलं आहे, ते जर पक्ष बदलण्याचा विचार करत असतील तर मला खात्री आहे की उस्मानाबाद जिल्ह्यातील मावळे शरद पवार यांच्या विचारांना महत्व देऊन राष्ट्रवादी सोबत राहतील आणि त्यांचा पराभव करतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (NCP Jayant Patil) व्यक्त केला. राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव न घेता त्यांनी (NCP Jayant Patil) कडाडून टीका केली.
राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची सभा उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी येथे संपन्न झाली. त्या सभेला पाटील पिता-पुत्र गैरहजर होते. पद्मसिंह पाटील आणि आमदार राणा राष्ट्रवादी सोडून भाजपात जाणार असल्याची चर्चा होत असतानाच, पाटील परिवाराने शिवस्वराज्य यात्रेकडे पाठ फिरविल्याने त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे.
15 वर्ष तुम्ही मंत्री मंडळात होता, आता पवार साहेब अडचणीत आहेत आणि थोडासा पक्ष अडचणीत आल्यावर पक्ष सोडायला लागले. जेव्हा महाराष्ट्रात फंद-फितुरी झाली आहे, तेव्हा त्यांना प्रायश्चित झालं आहे. म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात कोणी फितुरी केली तर त्यांचा पाडाव करून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला निवडून द्या, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं.
फंद-फितुरी करून महाराष्ट्र ताब्यात घेण्याचं शिवसेना आणि भाजपचं सुरू आहे. त्यामुळे फितुरांच्या नादाला लागू नका. सूर्याजी पिसाळ कोण आहे हे महाराष्ट्राला कळू द्या आणि त्यापैकी एकही निवडून येणार नाही असं पाटील म्हणाले. आपल्या राष्ट्रवादीकडे नगाला नग असे उमेदवार आणि नेतृत्व आहे. कारण शरद पवार नावाचे विद्यापीठ आपल्याकडे आहे. निष्ठा आणि विचाराला आयुष्यात काही महत्व असतं. कोणाला पक्ष सोडायचा असेल तर तो मतलबाने सोडत आहे. ज्यांना भवितव्य अंधारात दिसत आहे, ते एका निवडणुकीत घाईला आले असून पक्ष सोडत आहेत, अशा शब्दात जयंत पाटलांना अजून राष्ट्रवादीतच असलेल्या पाटील पिता-पुत्रांवर हल्लाबोल केला.
राजकारणात बदल होतात, वाईट दिवस येत असतात, पण त्यासाठी पक्ष बदलायची गरजे नसते. ज्या पक्षाने आपल्याला वाढवलं, तो पक्ष सोडून दुसऱ्या अनोखी पक्षाकडे जाण्याची गरज नसते, असंही जयंत पाटील म्हणाले. या सभेला खासदार अमोल कोल्हे, अमोल मेटकरी, आमदार राहुल मोटे, जीवनराव गोरे, सुरेश बिराजदार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.