लोकसभा निवडणुकीपासून घरी गेलो नाही, बायको थेट दिल्लीला आली : दानवे
केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत पुण्यात सदस्य नोंदणी मोहिमेला शुभारंभ झाला. यावेळी रावसाहेब दानवे काँग्रेसवर निशाणा साधला.
पुणे : केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत पुण्यात सदस्य नोंदणी मोहिमेला शुभारंभ झाला. यावेळी रावसाहेब दानवे काँग्रेसवर निशाणा साधला. दानवे यांनी आपल्या खुमासदार शैलीत मार्गदर्शन केलं. दानवेंनी त्यांच्या स्टाईलमध्ये वेगवेगळे किस्से सांगून कार्यकर्त्यांना हसू आवरेनास झालं.
लोकसभा निवडणूक पार पडून एक महिना झालाय. मात्र अजून एकदाही घरी गेलो नाही. मंत्री झाल्याने शनिवारी, रविवारी घरी जाता येत नाही. दोन वेळा घरासमोरुन गेलो. जाताना-येताना फक्त घराकडे डोकून पाहिलं, मात्र घरी जाता आलं नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी बायको थेट दिल्लीला आली. काय झालं असं म्हणाली, मात्र मी काहीच नाही असं सांगितलं. गेल्या एक महिन्यापासून घराबाहेर आहे, काय हालत असेल, सवाल त्यांनी केला.
दरम्यान, दानवेंनी काँग्रेसवरही टीका केली. एवढी वर्ष सत्ता भोगूनही काँग्रेसला दोन महिने अध्यक्षही मिळाला नाही, यापेक्षा वाईट स्थिती काय असेल, असं त्यांनी म्हटलंय. राहुल गांधी रणांगण सोडून पळाले आहेत. काँग्रेस एका परिवाराचा पक्ष असून आमचा पक्ष हा परिवार असल्याचं दानवे म्हणाले.
महिलांना 33 टक्के आरक्षणाची गरज असल्याचंही दानवे म्हणाले. भाजपा सध्या आघाडीचा पक्ष झालाय, मात्र यासाठी मोठ्या प्रमाणात कष्ट घेतले. आमची कपडे काढल्यावर पाठीवर काठ्यांचे ओळ दिसतील असं त्यांनी म्हटलंय. विधानसभेत युती होणार असून आपला उमेदवार असो नाहीतर नसो, सर्वांनी प्रामाणिकपणे काम करायचं आणि 220 आमदार निवडून आणायचे, असं आवाहनही दानवे यांनी केलं.