“दाऊद, लादेन आणि राहुल गांधी यांच्यात काही फरक नाही”; भाजप नेत्यानं राहुल गांधी यांना थेट दहशतवाद्यांच्या पंक्तीत बसवलं…
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारताची बदनामी केली आहे. त्यामुळे भाजपकडून आता त्यांची तुलना दाऊद इब्राहिम, ओसमा बिन लादेन यांच्याबरोबर केली आहे.
सिंधुदुर्ग : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना हॉवर्ड आणि केंब्रिज विद्यापीठामध्ये व्याख्यानासाठी बोलवल्यानंतर त्यांनी केलेल्या भारतीय राजकारणावरील वक्तव्यामुळे आता भाजपकडून त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला जात आहे. राहुल गांधी यांनी भारतीय राजकारणाविषयी बोलताना सत्ताधाऱ्यांकडून संसदेमध्ये कशा पद्धताने वागणूक दिली जाते त्यावर परदेशात जाऊन वक्तव्य केले होते. त्यावरून आता राहुल गांधी यांच्यावर केंद्रापासून ते राज्यातील नेत्यांकडून जोरदार निशाणा साधला जात आहे.
त्यावरूनच आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
नितेश राणे यांनी राहुल गांधी यांच्यावर पत्रकार परिषदेत टीका करताना ते म्हणाले की, काँग्रेसचे राहुल गांधी यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे.
पाकिस्तान आणि राहुल गांधींची भाषा एकच असल्याची गंभीर टीका नितेश राणे यांनी केली आहे. दाऊद इब्राहिम, ओसामा बिन लादेन आणि राहुल गांधी यांच्यामध्ये काहीच फरक नसल्याचे म्हणत त्यांच्यावर त्यांनी जहरी टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी परदेशातील विद्यापीठात व्याख्यान दिल्यापासून भाजपने राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.
राहुल गांधी यांच्यामुळे भारताच्या संसदीय लोकाशाहीची बदनामी झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे भाजप आणि त्यांच्या नेत्यांकडून राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात येत आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्याचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीकडून दुसऱ्यांदा छापेमारी करण्यात आल्याने नितेश राणे यांच्याकडून त्यांच्यावरही टीका करण्यात आली आहे.
हसन मुश्रीफ यांनी भ्रष्टाचार केलाय याबाबत त्यांच्या कार्यकर्त्यांना गॅरंटी आहे का? तुमच्या नेत्यांनी जर भ्रष्टाचार केला असेल तर ईडीचे अधिकारी तुमची चौकशी करणार मात्र तुम्ही जर काहीच केलं नसेल तर तुम्हाला घाबरण्याचे काहीच कारण नाही असा घणाघात त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
ईडीसारख्या यंत्रणा भाजपने निर्माण केलेल्या नाहीत. त्या फार पूर्वीपासून आहेत.त्यांना जिथे जिथे भ्रष्टाचार दिसतो तिथे ते जातात असा टोलाही त्यांनी हसन मुश्रीफ यांना लगावला आहे.