90 टक्के शिवसैनिक पक्ष सोडतात, याला संजय राऊत जबाबदार; नितेश राणे यांचे संजय राऊतांवर ब्लॅकमेलिंगचे आरोप
Nitesh Rane on Snajay Raut : संजय राऊत ब्लॅकमेल करतात, ठाकरे गटाच्याच एका आमदाराने मला सांगितलं; नितेश राणे यांचा दावा
सिंधुदुर्ग | 23 जुलै 2023 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत… विरोधकांच्या कायम निशाण्यावर… जेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व नाकारलं तेव्हाही राऊतांवर गंभीर आरोप ठेवण्यात आले. संजय राऊत यांच्याचमुळे शिवसेना पक्षात दोन गट निर्माण झाल्याचं बोललं गेलं. आताही भाजपचे नेते नितेश राणे यांनी संजय राऊतावंर गंभीर आरोप केलेत.
नितेश राणे यांनी एक ट्विट करत ठाकरे गटात संजय राऊतांबाबत नाराजी असल्याचं म्हटलं. तसंच संजय राऊत हे ब्लॅकमेल करत असल्याचं ते म्हणालेत.
नितेश राणे यांचं ट्विट
मी एका उबाठा आमदाराला आमदार निवासात भेटल्यानंतरची चर्चा..
मी – कसे चालले आहे..
उबाठा आमदार – तुम्हाला माहीतच आहे साहेब..
मी – तुमचं भविष्य काय ?
उबाठा आमदार – काय माहित बघू काय होत ते..
मी – उद्धवजींशी तुम्ही चर्चा का करत नाही ?
उबाठा आमदार – त्यांनी ऐकलं तर पाहिजे..
मी -…
— nitesh rane (@NiteshNRane) July 23, 2023
आजच्या पत्रकार परिषदेतही नितेश राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. गेल्या आठवड्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या आमदारासोबत जी चर्चा झाली त्याच मी आज ट्विट केलं आहे. त्या आमदाराने स्पष्ट सांगितलं उद्धव ठाकरेंना संजय राऊत ब्लॅक मेल करत आहेत. कुठले तरी कागदपत्रे संजय राऊत जवळ असल्याने उद्धव ठाकरे राऊत यांना ते बोलत नाहीत. 90 टक्के शिवसैनिक जातात याला कारण संजय राऊत आहेत, असं नितेश राणे म्हणालेत.
काही चर्चा अफवा फिरत आहेत. त्याचा उल्लेख संजय राऊतच करतोय. शिंदे साहेबांना बदलणार, नवा मुख्यमंत्री होणार अशा अफवा ठाकरे गटाची माणसं करत आहेत. पण मी सांगतो की, 2024 पर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.
बाळासाहेबांच्या तोंडातून निघालेला शब्द त्यांनी कधी मागे घेतला नाही. उद्धव ठाकरे डुप्लिकेट आहे. तो ठाकरेंचा नाहीच. संजय राऊतने राष्ट्रवादीच्या त्या आमदारांची नावं घ्यावीत. मी ठाकरे गटाच्या आमदारांचं नाव देईल, असं नितेश राणे म्हणालेत.
रायगडच्या खालापूरमध्ये दरड कोसळली. यामुळे इर्शाळवाडी हे अख्ख गाव दरडीखाली दबलं गेलं. तिथे आताही शोधकार्य सुरू आहे. अशात ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी काल भेट दिली. त्यावर नितेश राणे यांनी टीका केली आहे.
उद्धव ठाकरे पायथ्याशी गेले 10 ते 15 लोक जमा केलं. बोलले आणि निघून गेले. जिथे घटना घडली तिथे पोचलेच नाहीत. तमाशा करण्यासाठी, फोटो काढण्यासाठी ते इर्शाळवाडीला गेले. त्या दिवशी विधान भवनात सभागृहात फक्त 43 मिनिटं ते होते. त्यांचं जनतेसाठी दुटप्पी प्रेम आहे. ही नोंटकी एकदाच बाहेर काढली आणि काम करणारं सरकार राज्यात सत्तेत आलं आहे, असं नितेश राणे म्हणाले आहेत.