तुम्ही प्रवेश बंदीचा निर्णय घेता, पण आमचं जगणं मुश्किल होतं; रत्नागिरी जिल्ह्यात कोल्हापूरातील व्यापाऱ्यांना प्रवेश बंदी
कोल्हापूरातील अनेक छोटे मोठे व्यापारी रत्नागिरी जिल्ह्यातील बाजारासाठी जातात. त्यांच्यासोबत टेम्पो चालक आणि हमालही जात असतात. जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांनाच प्रवेश बंदी केल्यामुळे व्यापाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या खासगी वाहन चालक आणि हमाली करणाऱ्यांचाही रोजगार बुडाला आहे.
कोल्हापूर: कोल्हापुरातून रत्नागिरी जिल्ह्यात आठवडी बाजारासाठी जाणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांची रत्नागिरी (Ratnagiri) जिल्हा प्रशासनाकडून अडवणूक केली जात आहे. कोरोना (Corona) प्रादूर्भावाचे कारण देत गेल्या महिन्याभरापासून या किरकोळ व्यापाऱ्यांना जिल्ह्यात प्रवेश नाकारण्यात येत आहे. या प्रकारामुळे हजारो व्यापाऱ्यांना फटका बसत असून कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या (APMC kolhapur) उलाढालीवरही याचा विपरित परिणाम झाला आहे. रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश काढला पण त्यांच्या एका आदेशामुळे अनेक जणांच्या रोजगारावर गदा आली आहे. कोल्हापूर जिल्हातील अनेक व्यापारी रत्नागिरीतील बाजारासाठी जातात, त्यावर जसे व्यापारी अवलंबून आहेत तसेच अनेक हमालही रत्नागिरीतील बाजारावर अवलंबून आहेत. त्यामुळे प्रवेश बंदी उठवावी अशी छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे.
पालेभाज्या आणि कडेधान्यही कोल्हापूरातून
कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी आजरा, चंदगड अशा तालुक्यातील अनेक किरकोळ व्यापारी रोज आठवडी बाजारानिमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यात जातात. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधून पालेभाज्या, कडधान्ये, फळे असा माल खरेदी करून रोज ते रत्नागिरी जिल्ह्यातील आठवडी बाजाराच्या ठिकाणी जातात.
एका आदेशाने कित्येक दिवसांची हमाली बुडाली
रत्नागिरी जिल्ह्यातील बाजारासाठी हजारो किरकोळ व्यापारी बाजारासाठी जातात. त्यांच्यासोबत टेम्पो चालक आणि हमालही जात असतात. जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांनाच प्रवेश बंदी केल्यामुळे व्यापाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या खासगी वाहन चालक आणि हमाली करणाऱ्यांचा रोजगार बुडाला आहे.
राज्यात बंदी नसतानाही प्रवेश बंदीचा आदेश
रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रवेश बंदीचा आदेश काढला आणि व्यापारी, हमालांचा रोजगारच बुडाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या एका आदेशामुळे सगळा व्यवहार ठप्प झाला आहे. जिल्हाधिकार्यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात काढलेल्या आदेशानुसार इतर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना रत्नागिरीच्या आठवडी बाजारामध्ये येता येणार नाही. राज्यात कोठेही जिल्हा बंदी नसताना रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र काढलेल्या आदेशामुळे व्यापाऱ्यांच मोठे नुकसान होत आहे.
निर्णय मागे घ्यावा
गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे हतबल झालेल्या किरकोळ व्यापाऱ्यांचा व्यवसाय आता कुठे सुरळीत होत असतानाच रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे व्यापाऱ्यांना जिल्ह्यात प्रवेश नाकारला जात आहे. हा निर्णय मागे घेतला जावा यासाठी हे व्यापारी गेल्या महिन्याभरापासून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे फेऱ्या मारत आहेत मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे किरकोळ व्यापारे असणारे सचिन कापसे सांगतात.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीला फटका
रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी किरकोळ व्यापाऱ्यांना जिल्हा प्रवेश बंदी केली, मात्र याचा फटका फक्त व्यापाऱ्यांनाच बसला असा नाही तर कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीलाही बसत आहे. मुळात गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीमधील मालाची आवक कमी झाली आहे. सध्या फळे आणि पालेभाज्यांची दरही गडगडले आहेत. या कारणांचा शोध शेती उत्पन्न बाजार समितीने घेतल्यानंतर रत्नागिरी जिल्हा प्रवेश बंदीचे हे प्रकरण समोर आले असल्याचे व्यापारी धनंजय महाजन सांगतात. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक सूर्यकांत पाटील यांनीही रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करत रत्नागिरी जिल्ह्यातील ग्राहकांनाही कोल्हापूरातील व्यापऱ्यांची गरज असताना त्यांना का प्रवेश नाकारला जात आहे असा सवाल उपस्थित केला आहे.
संबंधित बातम्या