महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत काँग्रेसच्या बड्या नेत्याचे मोठं वक्तव्य
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी भर सभेत आम्ही राष्ट्रवादीसोबत जाणार नाही... नाही... नाही... अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा केली. मात्र, त्याच राष्ट्रवादीसोबत ते गेले. फडणवीस बोलतात त्यांच्या उलटं वागत आले आहेत.
कराड : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याने विरोधकांची संख्या कमी झाली आहे. त्यातच विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते अभावी हे अधिवेशन होत असल्याने या अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांची कशी कोंडी करणार हा प्रश्न आहे. तर, विरोधकांवर सत्ताधारीच हावी होण्याची चिन्हे आहेत. अशातच काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर आपला दावा सांगितला आहे. यामुळे महाविकास आघाडीतही सारं काही आलबेल आहे असे वातावरण नाही.
विधानसभेत आमचे संख्याबळ जास्त आहे त्यामुळे विरोधी पक्षनेते पद आम्हाला मिळावे. तशी मागणी आम्ही विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे करणार आहे. ही परिस्थिती का आली? एका वर्षात दोनदा पक्ष फोडणं आजपर्यंत कधी झालं नाही. राज्याच्या राजकारणात अशी गोंधळाची परिस्थिती कधीही पाहिली नाही, अशी टीका करतानाच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलीय.
माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी बाळासाहेब थोरात कराड येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. आम्ही राष्ट्रवादीसोबत जाणार नाही… नाही… नाही… म्हणणारे अखेर त्यांच्यासोबतच गेले. फडणवीस जे बोलतात त्यांच्या उलट वागत आले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
एक मुख्यमंत्री, एक पूर्वीचा मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री, दुसरा एक उपमुख्यमंत्री झाला. त्याला आता मुख्यमंत्री व्हायचं आहे. एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत. पण इथे आता तीन तलवारी एका म्यानात आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्यात सगळीकडे भष्टाचार चालला आहे. जनतेच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून जनतेत प्रचंड नाराजी आहे. आमदारांमध्ये संघर्षाचे वातावरण आहे. त्यामुळे राज्यात असे सरकार नको. त्यापेक्षा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी यावेळी बाळासाहेब थोरात यांनी केली.