तर भाजपला लवकरच जलयात्रा… उद्धव ठाकरे यांनी साधला भाजपवर थेट निशाणा
बिनकामाचा आयुक्त तिथे आणून बसवला आहे. जे आयुक्त आहेत ते केवळ पदासाठी जर लाचारी करणार असतील तर त्या आयुक्तांनाही सांगायचे की तुम्ही पदभार स्वीकारताना शपथ घेतली त्या शपथेची प्रतारणा करू नका.
ठाणे : उद्धव ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांच्या मारहाणीवरून संतप्त झालेल्या उद्धव ठाकरे यांनी थेट भाजपवरच शरसंधान केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुंड मंत्री म्हणतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. भाजपकडून सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. यावरूनही ठाकरे यांनी भाजपला खडे बोल सुनावले आहेत. ज्यांच्या नावाने यात्रा काढत आहात त्यांचे विचार जर तुमच्या रक्तात नसतील तर या फुकाच्या यात्रा काढू नका, अशी टिकाही त्यांनी केली.
ठाण्यात रोशनी शिंदे यांची भेट घेतल्यानंतर पोलीस आयुक्तांना भेटायला गेलो. पण ते जागेवर नव्हते. बिनकामाचा आयुक्त तिथे आणून बसवला आहे. जे आयुक्त आहेत ते केवळ पदासाठी जर लाचारी करणार असतील तर त्या आयुक्तांनाही सांगायचे की तुम्ही पदभार स्वीकारताना शपथ घेतली त्या शपथेची प्रतारणा करू नका.
जर असा बिन कामाचा आयुक्त तिथे बसणार असेल तर त्याला निलंबित करा किंवा बदली करा. कणखर असा आयुक्त ठाण्याला दिला गेला पाहिजे. गृहमंत्री फडणवीस लाळघोटेपणा करत नसतील नाही तर ते काल परवा काही तरी म्हणाले होते, लोक म्हणतील की तुमच्या कारभारावरती आम्ही थुंकतो तसे एवढं सगळं साचेल की मग तुम्हाला संपूर्ण लाळेने भरलेला चेहरा घेऊन लोकांसमोर जायला लाज वाटेल.
त्यासाठी आज जरा लाज, लज्जा, शरम आणि तुमच्या जरा तरी काही हिम्मत असेल तर ताबडतोब पोलीस आयुक्तांना निलंबित करा किंवा त्यांची बदली करा. जे पोलीस स्टेशन आणि त्याचे जे अधिकारी यांनी तक्रार घेतली नाही त्यांच्यावरही कारवाई करा. असे लाचार पोलीस जनतेचे रक्षणकर्ते होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
भाजप सध्या जे काही करत आहे. उगाच यात्रा काढायच्या. पण ते ज्यांच्या नावाने यात्रा काढतात त्यांचे विचार जर का तुमच्या रक्तात नसतील तर या फुकाच्या यात्रा काढू नका. नाही तर आमचे सरकार आल्यानंतर या सगळ्यांना त्यांची जलयात्रा ही काढावी लागेल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
आरोपींची नावे गल्लीबोळात लावा – उद्धव ठाकरे
मी पुन्हा सांगतो फडणवीस आहे, त्यांना झेपत नसेल. कदाचित त्यांना तसे वरून आदेश आला असेल तर त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेशी प्रामाणिक राहून पदभार सोडून द्यावा. जेणेकरून त्यांना जे काही येथे करावे लागते. हे करण्याची वेळ येणार नाही. तसेच आयुक्त आणि या पोलीस स्टेशन कासारवाडी यांची बदली करा. जे आरोपी आहेत त्यांची नावे रोशनी शिंदे यांनी सांगितली आहेत त्यांचे नाव आणि फोटो गल्लीबोळामध्ये लावा आणि सांगा की हे आरोपी आहेत अशी मागणी त्यांनी केली.