तर… नागपूरचे अर्धे चड्डीवाले करणार काय? सुजात आंबेडकर यांचा राज्यसरकारवर निशाणा
नाशिकच्या शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात झाली. तर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाची सांगता झाली. या मोर्चात कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
नाशिक | 9 नोव्हेंबर 2023 : राज्यातील १२ ते २० कुटुंबांनी राज्याच्या पाण्यावर ताबा ठेवला. त्या जोरावर त्यांनी साखर कारखाना, शेती उद्योग यावर ताबा ठेवला. पैसा खिशात घातला. त्याच जोरावर त्यांनी सत्ता पण ताब्यात घेतली. सत्ता आल्यानंतर स्वतःच्या पोराच्या नावावर शिक्षण संस्था केल्या. यामुळे ८० टक्के समाज वंचित राहिला. यात कष्टकरी, गोरगरीब, शेतकरी यांचा समावेश आहे. बाबासाहेबांनी ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ अशी शिकवण दिली. पण, सरकारचे उद्योग काही वेगळेच सुरु आहेत. अकरा महिने कुठे शाळा चालू असते का? नाही तर काय यांच्या बापाकडे शिकायला जायचं का? असा जळजळीत सवाल वंचित बहुजन युवा आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी शिंदे सरकारला केला.
वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने नाशिक शहरात एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. कंत्राटी भरती रद्द करावी, खाजगीकरण बंद करावे. जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करावा. पेपरफुटी संदर्भात कडक कायदा करावा या मागण्यांसाठी हा एल्गार मोर्चा काढण्यात आला होता.
मराठा समाजाच्या साखळी उपोषणकर्त्यांची घेतली भेट
सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एल्गार मोर्चा सुरु होता. त्यावेळी सुजात आंबेडकर यांनी शहरातील जिल्हा न्यायालयासमोरील शिवतीर्थावर मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी साखळी उपोषणाला बसलेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नागपूरचे अर्धे चड्डीवाले करणार काय?
मोर्च्याला संबोधित करताना सुजात आंबेडकर यांनी राज्यसरकारवर टीका केली. कंत्राटी भरती म्हणजे सरकार म्हणत आहे की, आम्हाला हे सरकार चालवता येत नाही म्हणून आम्ही हे सरकार भाड्याने चालवायला देत आहोत. ३ हजार पोलीस कंत्राटी भरतीवर घेणार आहे. जर खरंच हे पोलीस भाड्याने घेत असतील. तर मोहन भागवत यांना विचारायचं आहे की, नागपूरचे अर्धे चड्डीवाले करणार काय? सरकार इतकं नीच आणि नालायक आहे की, ते बेरोजगार लोकांकडून पैसे घेत आहे. कंत्राटी भरती ही संविधानानुसार नसेल. यातून आरक्षण मोडीत काढण्याचा देखील प्रयत्न आहे अशी टीका त्यांनी केली.