एकाच कुटुंबातील सहा अंध व्यक्तींना धनंजय मुंडेंचा मदतीचा हात
बीड तालुक्यातील साक्षाळ पिंपरी येथील एकाच कुटुंबातील सहा अंध व्यक्तींना धनंजय मुंडेंनी प्रत्येकी एक लाखांची मदत जाहीर केली
बीड : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कनवाळूपणाचं उदाहरण पाहायला मिळालं आहे. बीडमधील एकाच कुटुंबातील सहा अंध सदस्यांना धनंजय मुंडे यांनी प्रत्येकी एक लाखाची आर्थिक मदत (Dhananjay Munde Helps Beed Blind Family) जाहीर केली आहे.
बीड तालुक्यातील साक्षाळ पिंपरी येथील एकाच कुटुंबातील सहा जण अंध आहेत. गेल्या अनेक वर्षापासून त्यांची परवड होत होती. अनेक वेळा शासनदरबारी खेटे मारुनदेखील त्यांना कुठलीच शासकीय मदत मिळाली नव्हती.
ही बाब काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी या अंध कुटुंबाची भेट घेत त्यांच्या हाल-अपेष्टा जाणून घेतल्या.
अंध कुटुंबाचं दुःख जाणून घेतल्यानंतर धनंजय मुंडे हेलावून गेले. त्यांनी सामाजिक न्याय विभागातून या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली.
धनंजय मुंडे यांच्याकडे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आहे. याशिवाय महाविकास आघाडी सरकारने त्यांच्याकडे सामाजिक न्याय विभागाची धुरा सोपवली आहे.
कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते. दौऱ्यात त्यांनी नारायण गडावर जाऊन महंतांचे आशीर्वाद घेतले होते.
‘आम्हाला कोणालाही वाटले नव्हते की मी मंत्री होईन. मात्र आता मंत्री झालोय. त्यामुळे सर्वाधिक विकास बीड जिल्ह्याचा करायचा आहे. मी नारायणगडावर आशीर्वाद घेण्यासाठी आलो. आशीर्वाद घेण्यापूर्वी पालकमंत्रिपदाची घोषणाही झाली. आता कोणत्याही गडावरुन कसलंच राजकारण नाही, तर विकास होईल, असं धनंजय मुंडे त्यावेळी म्हणाले होते.
गेल्या आठवड्यात गहिणीनाथ गडावर वामनभाऊ यांच्या 44 व्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले होते. त्याशिवाय खासदार प्रीतम मुंडेही या कार्यक्रमाला हजर होत्या.
या कार्यक्रमादरम्यान धनंजय मुंडेंनी भाषणही केले होते. निवडणुकांच्या रणधुमाळीच्या आरोप प्रत्यारोपानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले होते.
Dhananjay Munde Helps Beed Blind Family