निवडणूक विभागाच्या भरारी पथकाचा छापा, मतदारांना वाटण्यासाठी आणलेलं हे साहित्य जप्त
नरवाड ग्रामपंचायत निवडणुकीत चुरशीची लढत सुरू आहे. प्रचाराची सांगता झाल्यानंतर आता मतदारांना साड्या वाटल्याचा प्रकार समोर आला आहे.
सांगली : १८ डिसेंबर रोजी ग्रामपंचायतीच्या सदस्यांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळं मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी साड्या आणि पैशांचा वापर केला जात असल्याचं प्रकरण समोर आलं आहे. सांगली जिल्ह्यातील नरवाड येथे ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या साड्या आणि पाचशे रुपयांच्या दोन नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने गावात छापा मारला. गावात यायच्या अगोदर गावातील चौकात दहा साड्या आणि पाचशे रुपयांच्या दोन नोटा चौकात आणून टाकल्या. या साड्या कोणी वाटण्यासाठी आणल्या होत्या याचा तपास सुरू आहे. आचारसंहिता कक्षाने साड्या आणि रोख रक्कम जप्त करून पोलिसांच्या स्वाधीन केल्या.
नरवाड ग्रामपंचायत निवडणुकीत चुरशीची लढत सुरू आहे. प्रचाराची सांगता झाल्यानंतर आता मतदारांना साड्या वाटल्याचा प्रकार समोर आला आहे. निवडणुकीमध्ये मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी साड्या आणि साड्यांमध्ये लपवून ठेवलेल्या पाचशेच्या नोटा काही लोकांनी आणून चौकामध्ये टाकल्या.
हा प्रकार मिरज ग्रामीण पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी नरवाड येथे धाव घेतली होती. या ठिकाणी आचारसंहिता कक्ष फिरते पथकाला माहिती देऊन पंचनामा केला. आचारसंहिता कक्षाच्या पथकाने दहा साड्या आणि त्यामध्ये लपवलेल्या दोन 500 च्या नोटा जप्त केल्या आहेत. अशी माहिती भरारी पथकाचे समीर मुल्ला यांनी दिली.
उद्या मतदान होत असल्यामुळं आजची रात्र वैऱ्याची आहे. काही कुठं भानगड होते का, याकडं उमेदवार लक्ष ठेवून आहेत. उद्या मतदारांच्या भवितव्य मशिनमध्ये बंद होणार आहे.