कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं कोणी… मंत्री जयकुमार गोरे यांचा खणखणीत इशारा, भाषणातून कुणाचा घेतला समाचार
Jaykumar Gore big Statements : विरोधकांकडून गंभीर आरोप झाल्यानंतर मंत्री जयकुमार गोरे ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी आता त्यांच्या राजकीय विरोधकांना थेट इशारा दिला आहे. त्यांनी माळशिरस इथल्या भाषणात जमके फटकेबाजी केली. त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप झाले. विरोधकांनी त्यांच्याविरोधात राळ उठवली. त्यानंतर सूत्र हलली. गोरे ॲक्शन मोडवर आले आणि विरोधकांविरुद्ध शड्डू ठोकले. त्यानंतर अनेक बदलही दिसले. विरोधकांनी टीकेची धार कमी केली. तर दुसरीकडे सावज आता टप्प्यात आलंय, थोडीशी वाट बघा असा इशारा देत कुणाला तरी चित्तपट व्हावे लागले याचा गर्भित इशारा मंत्री गोरे यांनी दिला. कुस्तीच्या डावात त्यांनी त्यांच्या विरोधकांना धोबीपछाड दिल्यानंतर वस्तादाला गाठणार असल्याचे जणू सूतोवाच केले.
कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा…
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे भाजपच्या शाखा उद्घाटन समारंभात शनिवारी रात्री जयकुमार गोरे यांनी तुफान फटकेबाजी केली. त्याच्या भाषणाची आता राज्यभर चर्चा सुरू आहे. त्यांनी या भाषणातून सातारा जिल्ह्यातील मोठ्या नेत्याला इशारा दिल्याचे बोलले जात आहे.




अख्खा जिल्हा, अख्खं राज्य जयकुमार गोरेला अडवायला रोज नदीकिनारी जाऊन पूजा घालत आहे, काळ्या बाहुल्या रोवतंय. साध्या घरातलं पोरगं, आमदार तीनवेळा झालं. एक निवडणूक अशी झाली नाही, माझ्यावर केस झाली नाही. पण कधीही मी थांबलो नाही. कितीही आडवं या, कितीही दाबायचा प्रयत्न करा, कितीही बाहुल्या बांधा. पण जोपर्यंत जयकुमार गोरेच्या मागे जनता आहे, तोपर्यंत तुम्ही जयकुमार गोरेचं कधी वाकडं करु शकत नाही.असा खरमरीत टोला त्यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांना लगावला. त्यावेळी सभेत शिट्ट्या आणि टाळ्यांचा आवाज घुमला.
मला अडवण्यासाठी गावातले जिल्ह्यातले काही लोक सकाळ-संध्याकाळ नदीच्या किनारी जाऊन पूजा बांधतात आणि काळ्या बाहुल्या बांधत आलेत. मात्र, जोपर्यंत जनता आणि माता भगिनी माझ्यासोबत आहेत तोपर्यंत तुम्ही कितीही पूजा केल्या आणि कितीही बाहुल्या बांधल्या तरी माझे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही असा टोला गोरे यांनी लगावला.
देवाभाऊचा आशीर्वाद पाठीशी
राज्यातील सर्वात दुष्काळी जिल्हा असणारा माण-खटाव पट्ट्यात हा पठ्ठ्या जन्माला आला आहे. माझ्या पाठीमागे भाजपा पक्ष तसेच देवाभाऊ उभा आहे. माण-खटाव तालुका आता दुष्काळमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. येत्या 32 दिवसांत शेतीचं पाणी तुमच्या बांधावर येईल हे लक्षात ठेवा, असे आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
माळशिरस तालुक्यातील दुष्काळी 22 गावांचा पाणी प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही माजी आमदार राम सातपुते आणि माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर या दोघांच्या निवडणुका लढविणार नाहीत असे म्हणत पाणी प्रश्न सोडवल्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाणार नसल्याचेच सूतोवाच त्यांनी केले.
माझी एकही निवडणूक अशी गेली नाही ज्यामध्ये माझ्या विरोधात केस झाली नाही, असे ते म्हणाले. एका महिलेला नग्न फोटो पाठविल्याच्या आरोपावरून वादात सापडलेल्या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तुफान टोलेबाजी करत आपल्यावरील आरोपांना जोरदार उत्तर या सभेतून दिले