इंदापूर – राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम बंद करावी. शेती पंपांचा वीज पुरवठा तात्काळ चालू करावा. अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट इशारा भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshwardhan patil) यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शेती पंपाचा वीज पुरवठा सुरू करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. या आंदोलन प्रसंगी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी मोबाईलद्वारे आंदोलकांशी संवाद साधत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. या आंदोलनप्रसंगी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन दिवसात सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन हर्षवर्धन पाटील व मान्यवरांना दिले होते. मात्र चार- पाच दिवस झाले तरी वीज पुरवठा पूर्ववत सुरु केलेला नाही, त्यामुळे शेतकऱ्याची चेष्टा करू नका, शांत असलेल्या शेतकऱ्यांचा उद्रेक होऊ देऊ नका, असा इशाराही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे.
यापूर्वीही वीज तोडणी मोहिमेच्या विरोधात इंदापूरात भाजप आक्रमक झाले होते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. आंदोलन दरम्यान पुणे -सोलापूर महामार्ग शेतकरी व भाजप कार्यकर्त्यांनी अडविला होता. या आआंदोलनाचा परिणाम वाहतुकीवर होत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्मण झाली होती. यानंतर राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे मामा यांच्या निवासाबाहेरही भाजपने धरणे आंदोलन केले होते. त्यावेळीही सरकारने वीज तोडणीची मोहीम रद्द करावी अशी मागणी ककरण्यात आली होती.