मुलीने बाबाची मान उंचावली की ! बारावीच्या परीक्षेत बाप-लेक फर्स्टक्लासमध्ये उत्तीर्ण
सोलापूर जिल्ह्यातील पिता-पुत्रीने एकाचवेळी बारावीची परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला तर आहेच, पण वडिलांपेक्षा अतिरिक्त गुणांचे पारडे पदरात पाडत मुलीने वडिलांपेक्षा गुणात सरशी घेतली आहे. विशेष म्हणजे बापलेक फर्स्टक्लासमध्ये उत्तीर्ण झाले आहे.
सोलापूरः नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. त्यात आणखी एक रोचक स्टोरी समोर आली आहे. बारावीच्या परीक्षेत बापासह लेकीने (Father and Daughter) ही कमाल केली आहे. करमाळा (Karmala) तालुक्यातील कविटगाव येथील वडिलांसह मुलगी एकाचवेळी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे गुण संपादन करण्यात मुलीने वडिलांवर मात केली आहे. तिच्या यशाचा वडिलांना अभिमान वाटत आहे. या परिक्षेत वडीलांना 70 टक्के तर मुलीला 86.50 टक्के गुण मिळाले आहेत. मुलीची आई ही सरपंच असून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वडील आणि मुलीने फर्स्ट क्लास (First class) मिळवत यश मिळविले आहे. मुलीने परीक्षेत चुणूक दाखवली असली तरी तिने खेळातही दमदार कामगिरी बजावली आहे. तिने रोप मल्लखांब आणि योगामध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटविला आहे.
कविटगाव येथील सरपंच विद्या सरडे यांचे पती पैलवान शिवाजी सरडे यांनी मच्छिंद्र नुस्ते कविटगाव येथील मच्छिंद्र विद्यालयातून 17 नंबरचा फॉर्म भरून बारावीची परीक्षा दिली. कारण यापूर्वी अडचणीमुळे याच शाळेतून त्यांना 1997 साली बारावीच्या परीक्षेपुर्वीच शाळा सोडावी लागली होती. पण त्याही नंतर त्यांच्या मनांत शिक्षणाची आस होती. म्हणून कोरोना काळात अभ्यास करून परीक्षा दिली. पर्यायाने त्यांना या परिक्षेत 70 टक्के गुण मिळवून पास झाले आहेत. योगायोग म्हणजे त्यांची मुलगी साक्षी शिवाजी सरडे ही बारामती येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतन येथे विज्ञान शाखेत बारावीलाच होती. तीला 86.50 टक्के गुण मिळवून ती उत्तीर्ण झाली आहे. साक्षी ही अभ्यासातच हुशार आहे असे नाही तर ती योगा व रोप मल्लखांबची राष्ट्रीय खेळाडू आहे. त्यामुळे वडील व मुलगी दोघेही प्रथम श्रेणीत बारावी उत्तीर्ण झाल्याने त्यांचे कौतुक होतं आहे, तर स्वतः वडील पैलवान शिवाजी सरडे यांना आपल्या मुलीने आपल्यापेक्षा जास्त गुण मिळवल्याचा अभिमान आहे.
तब्बल 25 वर्षांनतर यश खेचून आणले
पैलवान सरडे यांनी गावातील राजकारणात त्यांचा दम दाखवला. त्यांची पत्नी गावाची प्रमुख बनली. पत्नी सरपंच झाल्यानंतर त्यांना शिक्षणाची ओढ काही स्वस्थ बसू देत नव्हती. राजकारणात जम बसविल्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाची वाट चोखंदळली. मुलीसोबत इयत्ता बारावीची परीक्षा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 17 नंबरचा फॉर्म भरून बारावीची परीक्षा दिली आणि कष्टाचे चिज झाले. त्यांनी परीक्षेत 70 टक्के गुण मिळवत आपल्या जिद्दीची मोहर उमटवली.