लाखाचं बक्षीस? आम्ही सांगतो तानाजी सावंत कुठे आहेत.. संजय राऊत डोळे उघडा, सोलापुरात कार्यकर्ते भडकले!
घरात बसून काहीतरी टीका करायची म्हणून करतात. दीड वर्षे उद्धव, आदित्य ठाकरे बाहेर पडले नाहीत, त्यांच्यावर काही बोलले नाहीत, अशी टीका संजय राऊत यांच्यावर करण्यात आली.
संदीप शिंदे. सोलापूर, माढाः महाराष्ट्राला गोवरच्या साथीने घेरलं असताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) कुठे आहेत? असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र सामनातून (Samana) करण्यात आला. तसेच तानाजी सावंत यांना दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा, असे बक्षीसही सामनातून जाहीर करण्यात आले होते. त्यावरून तानाजी सावंत यांचे कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी आरोग्य मंत्र्यांच्याच पुढाकारातून मोठं आरोग्य शिबीर संपन्न झालं. गिनिज बुकनेही याची नोंद घ्यावी, असा हा उपक्रम झाला असताना संजय राऊत (Sanjay Raut) घरात बसून असा अग्रलेख लिहितात, याचा तीव्र निषेध आहे, असं वक्तव्य तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
संजय राऊत यांच्यावर संतापलेले कार्यकर्ते म्हणाले, ‘ 27 आणि 28 तारखेला दोन दिवसांचं महाशिबीर परांडा येथे होतं. . गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घ्यावी असं हे शिबीर झालं. येथील शिवाजी सावंत यांच्या मदतीने 2 लाख 31 हजार आरोग्य तपासण्या यावेळी झाल्या. महाराष्ट्रात असं आरोग्य शिबीर कुठेच झालं नाही. तानाजी सावंत हे सर्वसामान्याचे नेतृत्व आहेत. 24 तास सामान्य रुग्णांची सेवा करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. तरीही सामनातून त्यांनी तानाजी सावंत यांच्याबाबतीत हे शब्द वापरले आहेत. सामना पेपर आणि संजय राऊतांचा निषेध आहे, असं वक्तव्य कार्यकर्त्यांनी केलं.
तुम्हाला उन्हाचे चटकं बघितल्याशिवाय कळणार नाही. तुम्ही एसीत बसून बोलण्यापेक्षा स्वतः त्यांचं काम पाहा. कोटला मैदानातला व्हिडिओ पाहा. घरात बसणारे मुख्यमंत्री कुठे आहेत, हे लिहिलं नाहीत कधी… असा टोमणाही कार्यकर्त्यांनी लगावला.
सामना वृत्तपत्रातील टीका निंदनीय आहे. युती सरकार काम करत असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कॅबिनेटला सावंत होते. जगाने नोंद घ्यावी, असं शिबीर सावंत यांनी उभं केलं होतं. घरात बसून काहीतरी टीका करायची म्हणून करतात. दीड वर्षे उद्धव, आदित्य ठाकरे बाहेर पडले नाहीत, त्यांच्यावर काही बोलले नाहीत. त्यामुळे युवा सेनेतर्फे आम्ही संजय राऊत यांचा धिक्कार करतो, अशी संतप्त भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.