सोलापूर : शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास दिवाळीनंतर रस्त्यावर उतरणार असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला दिला. आमच्यामुळे विरोक्षी पक्ष रस्त्यावर उतरू लागेल, असा पलटवार कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला. यापूर्वी रस्त्यावर कितीवेळा उतरले हे देखील पाहिलं, असंही सत्तार यांनी म्हंटलंय. शेतकऱ्यांना मदत द्यावीच लागेल अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून या सरकारला जाब विचारेल. कारण सनदशीर मार्गानं आम्ही पाहणी करतो. मागण्या सरकारपुढं ठेवतोय, असं दानवे यांचं म्हणणंय.
यावर अब्दुल सत्तार म्हणाले, जरूर उतरा. कारण रस्त्यावर उतरण्याचीच पाळी आली. रस्त्यावर यायला पाहिजे. गरीब, शेतकरी, शेतमजुराला मदत करायला पाहिजे.ती नाही केली म्हणून तर ही वेळ आली. त्यांच्याकडं जी काही फौज होती 55 आमदारांची. या 55 पैकी 15 आमदार राहिले. 40 आमदार गेले. याचंही कुठंतरी चिंतन, मंथन करायला पाहिजे. आधी मंत्र्यांना, आमदारांना भेटायला वेळ नव्हता. आता ही परिस्थिती निर्माण झाली.
अब्दुल सत्तार म्हणाले, मला तर आश्चर्य वाटतंय अर्ध्या तासात किती शेतावर गेले असतील? काय ओला दुष्काळ कळला असेल? शेतकऱ्यांशी काय चर्चा केली माहीत नाही. जून, जुलै, ऑगस्टमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सप्टेंबरमध्ये मदत दिली. आताही ज्यांची नुकसान झाले त्यांनाही मत देण्यासाठी युद्धपातीवर काम करतोय.
आम्हाला गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यांची दिवाळी चांगली करायचे आहे. त्यांना मात्र फक्त राजकारण करायचे. ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांशी किती वफादारी केली. आम्ही शेतकऱ्यांशी कसे वागलो. याचा तुलनात्मक अभ्यास करावा, असा सल्लाही सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.
मी 45 दिवसांपासून पूर्ण महाराष्ट्रात फिरतोय. मात्र यांनी अर्धा तासात काय पाहिलं असेल. त्यांना दुष्काळ काय कळाला असेल? ते फक्त राजकारण करण्यासाठी आलेले आहेत, अशी टीकाही सत्तार यांनी ठाकरे यांच्यावर केली. सत्तेत असताना त्यांनी वेळ दिला असता तर आज ही वेळ आली नसती, असंही ते म्हणाले.