ईडीची चौकशी आणि छगन भुजबळांचं विधान; जयंत पाटील काय म्हणाले?
Jayant Patil on Chhagan Bhujbal Statement : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय का घेतला? यावर भाष्य केलं आहे. त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर....
अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्ष भाजपबरोबर महायुतीत सहभागी झाल्याने सगळ्यांनाच आनंद झाला. कारण ईडीपासून झालेली सुटका… ती सुटका झाल्याने सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला, असं छगन भुजबळ यांनी ‘2024 : द इलेक्शन सरप्राईज्ड इंडिया’ या पुस्तकात म्हटलं आहे. त्यावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ पुस्तक यांनी स्वतः हून सांगितलं की ओबीसी असल्याने ईडी आणि यंत्रणांनी फार त्रास दिला आणि काही लोकांच्या चौकशी सुरु झाल्या. त्यामुळे चौकशी सुरु होतायत म्हटल्यावर एकत्रितपणे येऊन भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असं म्हटलंय. तिकडचं संरक्षण मिळवलं असं भुजबळ साहेबांच्या बोलण्यातून दिसतंय. त्यामुळे ते तिकडं का गेले? हे लोकांना पुन्हा एकदा कळालं आहे, असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदींच्या विधानावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
काल जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ है असं विधान केलं. त्यांच्या या विधानावरही जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. समाजाला वेगवेगळ्या ठिकाणी बाटण्याचे काम यांनीच केलं आहे. समाज एक राहण्यापेक्षा समाजात विघटन कसं होईल. यासाठी यांचे मागच्या दोन तीन महिन्यापासून उद्योग सुरु आहेत. हिंदुचे मतं एकत्रित करण्यासाठी एक आमदार महाराष्ट्र फिरून आले आणि टोकाची भाषा केली. महाराष्ट्रमधील हिंदू मुस्लिम समाज हा समजूतदार, त्यांना समजतं की निवडणुकीत पोळी भाजण्यासाठी हे सगळं बोलतात. महाराष्ट्रमधील जनता यांच्यामुळे विचलित होतं नाही. इथल्या जनतेचे प्रश्न हे वेगळे आहेत, महागाई, महिला अत्याचार अशा प्रशांवर बोला. महाराष्ट्र प्रगतीसाठी बोला, ते न बोलता दुसरेच विषय इथे येऊन बोलता हे दुर्दैवी आहे, असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्रिपदावर जयंत पाटील काय म्हणाले?
शिराळ्याच्या सभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले आहेत. त्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित दादा आणि एकनाथ शिंदे हे दोघेही भाजपसोबत संरक्षण मिळवण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे ते टर्म्स सांगू शकत नाहीत. भाजपला येत्या निवडणुकात विजय मिळण्याची शक्यता कमी आहे. जर मिळाला तर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा मानस त्यांनी जाहीर केलंय. त्यामुळे यावर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया महत्वाची आहे, असं जयंत पाटील म्हणालेत.