सागर सूरवसे, टीव्ही 9 मराठी, सोलापूर | महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडला. या राजकीय भूकंपाचे केंद्रबिंदू ठरले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार. अजित पवार यांच्यासह एक मोठा गट राज्य सरकारमध्ये सामील झाला. अजित पवार यांच्यासह एकूण 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी साडे 3 वर्षात भाजप, मविआ आणि त्यानंतर महायुतीकडून उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आणखी एका मोठ्या पक्षात धमाका होणार असल्याचा दावा प्रवक्त्याने केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेमध्ये धमाका होणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते फारूक अहमद यांनी केला आहे. फारूक अहमद यांच्या या दाव्यामुळे राजकीय विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन पार पडला. यावेळेस अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष व्हायला आवडेल, असं म्हटलं होतं. मात्र सोबतच याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घ्यावा,असंही दादांनी स्पष्ट केलं होतं. दादांनी एका प्रकारे पक्षाला पर्यायाने शरद पवार यांना अल्टिमेटम दिला होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
वंचित प्रवक्ते फारुक अहमद यांनी या अल्टिमेटमचा धागा धरत प्रतिक्रिया दिली. “राष्ट्रवादीमध्ये ज्या पद्धतीने अजित पवार यांनी मला प्रदेशाध्यक्ष करा नाहीतर, निर्णय घेईल असं सांगितलं होतं. मात्र अजित पवार यांनी फक्त निर्णय घेतला नाही, तर संपूर्ण पक्षच भाजपच्या बाजूने उभा केला”, असं फारुक अहमद यांनी म्हटलं. सोलापुरात वंचितची पत्रकार परिषद पार पडली. यावेळेस ते बोलत होते.
अजित दादांनी प्रदेशाध्यक्षपदाची मागणी केली होती. त्याप्रकारे काँग्रेसमध्येही प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक इच्छूक आहेत. काँग्रेसची ही इच्छूक मंडळीही भाजपमध्ये जाईल, असं भाकीत फारुक अहमद यांनी केलं.
“काँग्रेसमध्ये देखील प्रदेशाध्यक्षपदाची मागणी करणारे अनेक नेते आहेत. हे काँग्रेसचे नेते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत, तेही आज ना उद्या उघडपणे येतील. त्यांना उघडपणे भाजपसोबत जाऊन राजकारण करायचे आहे की लपून करायचंय, हेही काँग्रेसच्या नेत्यांमधून आपल्याला दिसून येत आहे”, असं फारुक अहमद यांनी सांगितलं.
फारुक अहमद यांनी राज्यातील जनतेला सावध व्हा,असा खबरदारीचा इशारा दिलाय. “आता महाराष्ट्राच्या जनतेने सावध व्हायला हवं. संविधानाची मूल्य तुडवणारे पक्ष आपल्याला सरकारमध्ये आणायचं की 2024 मध्ये यांना ‘चले जाव’चा नारा द्यायचा?”,असा सवालही फारुक अहमद यांनी राज्याच्या जनेतला प्रश्न केलाय.
“नेत्यांमध्ये नैतिकता आणि चरित्र राहिलेलं नाही. भ्रष्टाचारात गुंतलेल्या नेत्यांच्या हातात पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे ईडीची बंदूक यांच्या कनपटीवर ठेवलेली आहे”, असं म्हणत फारुक अहमद यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाव न घेता हल्लाबोल केला.
“तुरुंगात जायचं की सत्तेत,असा पर्याय काँग्रेस नेत्यांना दिलेला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अनेक नेत्यांना ईडीच्या नोटीस आलेल्या आहेत. अशोक चव्हाण यांच्यासह अनेक नेते हे ईडीच्या रडारवर आहेत. तसंच 16 आमदारांच्या निलंबन झाल्यानंतर सरकार अल्पमतात येईल याची पूर्वकल्पना आल्याने हा डाव साधल्याची शक्यता आहे” असंही फारुक अहमद यांनी नमूद केलं.