Nana Patole : देश अन् राज्यावरचं संकट दूर कर; अकलूजमध्ये तुकोबांच्या पालखीत सहभागी झाल्यानंतर नाना पटोलेंचं विठ्ठलाला साकडं
मविआ सरकारने संकटात तातडीने मदत देऊन शेतकऱ्यांना भक्कम आधार दिला. राज्यातील नवीन सरकारनेही तातडीने शेतकरी हिताचे निर्णय घेऊन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले.
मुंबई : देशावर आणि राज्यावर आलेले संकट गंभीर असून या संकटातून जनतेची सुटका झाली पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या पूर्वजांनी बलिदान दिले, त्याग केला ते स्वांतत्र्य, लोकशाही आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आज धोक्यात आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले. ते सोलापुरातील अकलूज येथे बोलत होते. नाना पटोले यांनी दिंडीत सहभागी होत जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज (Sant Tukaram maharaj palkhi) यांच्या पालखीचे सोलापूर येथील अकलूज येथे दर्शन घेतले, त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच भाजपावर अप्रत्यक्ष टीका केली. देशावर आलेले हे मोठे संकट आहे. या संकटातून देश वाचला पाहिजे. देश वाचला तर आपण वाचू. त्यासाठी पंढरपूर येथील विठुरायाला (Pandharpur wari) साकडे घातले आहे, असेही ते म्हणाले.
रिंगण सोहळ्यातही पटोले सहभागी
राज्यातील शेतकऱ्यांवरील अस्मानी, सुल्तानी संकटातून सुटका कर आणि त्याच्या आयुष्यात सुखा-समाधानाचे दिवस येऊ दे, अशी प्रार्थना पंढरपूरच्या विठ्ठलाकडे केली आहे, असे पटोले म्हणाले. दरम्यान, यावेळी भक्तिमय वातावरणात सर्व वारकरी न्हाऊन निघाले. अकलूज येथे झालेल्या रिंगण सोहळ्यात वारकऱ्यांसह पटोले सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.
‘मविआप्रमाणेच नव्या सरकारनेही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहावे’
मागील दोन-तीन वर्षात शेतकऱ्यांना अतिवृष्टी, चक्रीवादळ, गारपिटीचा संकटाचा सामना करावा लागला. शेतातील उभे पीक हातातून गेले. शेतकऱ्याच्या तोंडातला घास हिरावून घेतला गेला. मविआ सरकारने त्या संकटात तातडीने मदत देऊन शेतकऱ्यांना भक्कम आधार दिला. राज्यातील नवीन सरकारनेही तातडीने शेतकरी हिताचे निर्णय घेऊन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. जून महिना संपला तरी राज्याच्या काही भागात पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. आता पावसाला सुरुवात झाली आहे, यंदाचा खरिपाचा हंगाम चांगला जावा आणि शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे यावेत हीच विठुराया चरणी प्रार्थना केल्याचे नाना पटोले म्हणाले.