सोलापूर : मुंब्र्यात लावण्यात आलेले उद्धव ठाकरे यांचे बॅनर फाडण्यात आले आहेत. त्यावरुन आता शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात शाब्दीक लढाई सुरु झाली आहे. दोन्ही गटांकडून परस्परांची लायकी काढण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात मुंब्र्यातील ठाकरे गटाची शाखा बुलडोझर लावून तोडण्यात आली होती. आज दुपारी उद्धव ठाकरे मुंब्र्यात येणार आहेत. त्याआधी दोन्ही गटाकडून आक्रमक भाषा सुरु आहे. “संजय राऊत तुमची लायकी काय ? हे महाराष्ट्राला माहित आहे. सिलवर ओकच्या बाहेरील द्वारपाल. सिलवर ओकचा पगारी नोकरी ही त्यांची स्वत:ची लायकी आहे” अशा शब्दात नरेश म्हस्के यांनी घणाघाती टीका केलीय. ते शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत.
त्यांच्या या टीकेला आता ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी प्रत्युत्तर दिलय. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जीवावर बॅनर फाडणाऱ्यांची मस्ती ठाण्यातील शिवसैनिक उतरवणार. समोरासमोर लढण्याची ताकद तुमच्या मनगटात नाही म्हणून तुम्ही रात्री बॅनर फाडता” असं शरद कोळी यांनी म्हटलय. “तुम्ही नामर्दाप्रमाणे रात्री बॅनर फाडता. पण शिवसैनिक तुम्हाला दिवसा फडल्याशिवाय राहणार नाही. ठाणे हे तुमच्या किंवा एकनाथ शिंदे यांच्या बापाचे नाही तर शिवसैनिकांचे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे आहे” असं शरद कोळी म्हणाले.
‘तुम्हाला पुन्हा रिक्षा चालवावी लागेल’
“मस्ती आलेल्या बोकडाप्रमाणे माजला आहात. पण मरीमाई यात्रेवेळी माजलेल्या बोकडाला कापले जाते. ठाण्यातील शिवसैनिक एकनाथ शिंदेंची मस्ती उतरवतील. त्यासाठी उद्धव ठाकरेंची गरज नाही. शिवसैनिकांनी मस्ती उतरल्यावर तुम्हाला पुन्हा रिक्षा चालवावी लागेल” असं शरद कोळी यांनी म्हटलय.