मराठा आरक्षणासाठी संपवलं जीवन, सुसाईड नोटमध्ये पंकजा मुंडे, भुजबळांचं नाव घेत विनंती
Prasad Dethe Marathi News : मराठा आरक्षणासाठी सोलापूर बार्शी येथील प्रसाद देठे यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. मराठा समजासाठी आपण स्वत:ला संपवत असून यासाठी कोणालाही जबाबदार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच त्यांनी सुसाईड नोटमध्ये ओबीसी नेत्यांची नावे घेतली आहेत.
बीड लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. त्यांच्या पराभव सहन न झाल्याने दोन समर्थकांनी आपलं जीवन संपवलं होतं. या दोन्ही घटना ताज्या असताना मराठा आरक्षणासाठी बार्शीमधील एका युवकानेही जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. प्रसाद देठे असं या युवकाचं नाव असून त्यांनी सुसाईड नोट लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी ओबीसी नेत्यांची नाव घेतली आहेत. तर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना आपला लढा सुरू ठेवावा अशी मागणी केली आहे.
कोण आहेत प्रसाद देठे?
मराठा आरक्षणासाठी आपलं जीवन संपवण्याचा निर्यण घेणारे प्रसाद देठे मूळचे बार्शीमधील आहेत. पुण्यामधील एका खासगी कंपनीमध्ये ते कामाला होते. आपल्या सुसाईड नोटमध्ये प्रसाद देठे यांनी ‘फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळावे’ यासाठी आपण आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्येला कोणी जबाबदार नसल्याचं म्हटलं आहे.
प्रसाद देठे यांच्या सुसाईड नोटमध्ये काय?
जसोस्तु मराठा
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. पंकजाताई, भुजबळ साहेब, हाके, शेंडगे, तायवाडे, टी.पी. मुंडे, गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या. विनंती आहे तुम्हाला. हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे. माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही. मी स्वखुशीने मरत आहे. जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका. विनंती आहे तुम्हाला. माझं तुम्हाला पटणार नाही, पण मी पूर्ण हताश झालोय. चिऊ मला माफ कर. लेकरांची काळजी घे. धीट रहा. मला माफ करा. तुमचाच प्रसाद
प्रसा देठे आपल्या सोशल मीडियावरही व्हिडीओ टाकत होते. मराठा आरक्षणाचा जरांगे पाटील यांचा लढा सुरू झाल्यापासून ते आपल्या सोशल माध्यमांवर सक्रिय असलेले पाहायला मिळाले होते. राज्यात आता ओबीसी आणि मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. मराठा आरक्षणाचं नेतृत्त्व मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी समाजाकडून लक्ष्मण हाके नेतृत्त्व करत आहेत.