शरद पवार गटाच्या विजयी उमेदवाराला अजित पवारांचा फोन?
Ajit Pawar Called NCP Sharad Pawar Group Leader : विधानसभा निवडणुकीचा काल निकाल लागला आहे. यात महायुतीला यश मिळालं आहे. तर काही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. अजित पवारांनी शरद पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन केला आहे. वाचा...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला भरघोस मतांनी विजयी केलं आहे. महायुतीला 230 जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपला तब्बल 132 जागांवर विजय मिळवण्यात यश आलं आहे. तर शिवसेना शिंदे गट 57 जागांवर विजयी झाली आहे. 41 जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार निवडून आले आहेत. मोहोळ विधानसभेची जागा मात्र अजित पवार यांना जिंकता आलेली नाही. तिथे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. त्या विजयी उमेदवाराला अजित पवारांनी फोन केल्याची माहिती आहे.
अजित पवारांचा खरे यांना फोन?
अजित पवारांचा उमेश पाटील आणि शरद पवार गटाचे विजयी उमेदवार राजू खरे यांना अभिनंदनाचा फोन आल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी ही माहिती दिली आहे. मोहोळ विधानसभेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने यांचा दारुण पराभव झाला. अजित पवार गटाचे मातब्बर नेते राजन पाटील यांचे विरोधक असलेले उमेश पाटील हे राजू खरे यांच्या विजयाचे शिल्पकार मानले जातात. त्यांना अजित पवारांनी फोन केल्याची माहिती आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
उमेश पाटील काय म्हणाले?
राजन पाटील यांची जुलमी, दडपशाही, हुकूमशाही वृत्तीला आमचा विरोध होता तो मतात रूपांतरीत केला. अजित पवारांनी मला फोन करून माझे आणि आमचे उमेदवार राजू खरे यांचे अभिनंदन केलं आहे, असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढील काळात आम्ही अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्यावर आमचा भर असेल. राजन पाटील यांचे भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीवेळी केलेले विधान त्यांना भोवले आहे. त्यामुळे अनगर अप्पर तहसील कार्यालयाचा निर्णय आणि कागदावरची विकासकामे यामुळे आमचा विजय झाला. अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात 1 लाख 60 हजार मतदार आहेत ते राजन पाटलांच्या लक्षात आले नसावेत, असं उमेश पाटील म्हणालेत.