नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हटलं, तर तो त्यांचा अपमान ठरेल, कारण…; शिवसेनेच्या मंत्र्याचं विधान चर्चेत
Tanaji Sawant on PM Narendra Modi and Loksabha Election 2024 : सोलापूरच्या बार्शीत महायुतीची सभा होत आहे. या सभेत शिवसेनेचे नेते, राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी भाषण केलं. या भाषणातील त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. वाचा सविस्तर...
धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी महायुतीची सभा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज बार्शीतील लक्ष्मी सोपान मार्केट यार्डात जाहीर सभा झाली. या सभेत शिवसेनेचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी भाषण केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचं त्यांनी कौतुक केलं. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हटलं तर तो त्यांचा अपमान ठरेल कारण ते विश्वगुरू आहेत. 2024 साली धाराशिवच्या लोकप्रतिनिधी हा मोदीसाहेबांच्या विचाराचा द्यावा लागेल. पश्चिम महाराष्ट्रप्रमाणे मराठवाडा करायचा असेल तर अर्चना पाटील यांना निवडून द्या, असं तानाजी सावंत म्हणाले.
तानाजी सावंत यांचा सवाल
भावनिक करून मतदान घेणं आणि विकासाचा प्रचार करून मतदान घेणं वेगळं… उद्धव ठाकरेंनी मला सांगितलं की धाराशिवचा खासदार निवडून आणा. त्यानंतर आम्ही त्याला निवडून आणले. समोरचा उमेदवार म्हणेल माझा बाप मारला, माझा बाप मारला…असं भावनिक करेल. 2009 ला भावनिक होऊन लोकांनी याला आमदार केलं. पण 2024 पर्यंत तेच सांगतो की माझा बाप मारला. पण तुझा बाप मारला म्हणतं. मतदारसंघातील लोकांचे बाप मारणार आहेस का?, असा सवाल तानाजी सावंत यांनी विचारला आहे.
महाविकास आघाडी सरकार उलथून टाकण्याचे काम धाराशिवमधून झालं. याला साक्षीदार देवेंद्र फडणवीस आहेत. संतनाथ साखर कारखाना 6 महिन्यात चालू करू शकतो. तो चालू करण्यापासून कोणाचा बाप आपल्याला अडवू शकत नाही. भंगारविक्या अशी ओळख असलेल्या नेत्याला आता पराभूत करा, असं म्हणत तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
सह्याद्रीप्रमाणे माझ्या मागे उभे राहिले ते म्हणजे देवेंद्र फडणवीस… बार्शीची ओळख तमाशाचा फड, गजरा लावण्याची ओळख पुसून आता विकासाची बार्शी अशी ओळख झाली आहे. मराठवाडा वाटरग्रीड योजना महाविकास आघाडीने बंद केली. मात्र 2022 ला सत्तेत आल्यावर आम्ही ती योजना पुन्हा सुरु केली, असं तानाजी सावंत म्हणाले.