सागर सुरवसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, सोलापूर | 17 जानेवारी 2024 : माझा दोन वेळा पराभव झाला आहे. तरीही प्रणितीताई शिंदेला आणि मला भाजपची ऑफर आहे, असा गौप्यस्फोट राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी गावात हुरडा पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. इथं कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुशीलकुमार शिंदे यांनी हे विधान केलं आहे. यानंतर शिंदे यांनी त्यांची भूमिकाही स्पष्ट केली. जरी भाजपने ऑफर दिली तरी काँग्रेस आमच्या रक्तात आहे. आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही, असं सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलं.
निवडणुकांमध्ये माझा दोन वेळा पराभव झाला आहे. असं असताना प्रणिती आणि मला भाजपमध्ये या, अशी ऑफर आहे. पण आता ते कसं शक्य आहे? ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो. जिथे आमचं बालपण आणि तारुण्य गेलं. त्याला कसं विसरायचं? आता मी 83 वर्षांचा आहे. त्यामुळे आता मी दुसऱ्याचं (भाजपचं) म्हणणं बरोबर आहे असं कसं म्हणणार? तुम्हाला हेही माहिती आहे की, प्रणिती पक्षीय बदलाच्या भानगडीत पडणार नाही, असंही सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
राजकारणामध्ये असं होत राहतं. हार-जीत होत राहते. पंडित जवाहरलाल नेहरू या माणसासोबत असं झालं. त्यांचाही पराभव झाला होता. त्या परभवा बाबतीत पंडित नेहरू म्हणाले होते की, लहान मुलाला सुरुवातीला आधार देऊन चालवावे लागतं. नंतर तो स्वतः चालतो. चालताना पडतो पुन्हा उठतो. पुन्हा पडतो पुन्हा उठतो…. मग तो चालायला लागतो आणि जेव्हा चालायला लागतो. तेव्हा तो पुन्हा कधी पडत नाही, असं नेहरूंनी सांगितलं होतं. हे उदाहरण एवढ्याकरता आहे की, माणसाला त्रास होतो पण पुन्हा शक्ती मिळते, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
तुम्ही काहीही काळजी करू नका. आज वाईट दिवस आहेत. मात्र ते दिवस निघून जातील. आपल्याला पुन्हा वैभवाचे दिवस येतील. याविषयी माझ्या मनामध्ये खात्री आहे. काँग्रेसला लोकांचा पाठिंबा आहे. काँग्रेसलाही वैभवाचे दिवस येतील, असं शिंदे म्हणालेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणुकीआधी सुशील कुमार शिंदे यांनी भाजपकडून ऑफर असल्याचा दावा केला आहे. सुशीलकुमार शिंदे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. मनमोहन सिंह यांच्या सरकारच्या काळात ते देशाचे गृहमंत्री होते. शिवाय देशाचं विद्युत मंत्रिपदीही त्यांच्याकडे होतं. 2004- 2006 या काळात ते आंध्रप्रदेशचे राज्यपाल होते. सुशीलकुमार शिंदे यांचं काँग्रेसमध्ये वजन आहे. शिवाय सोलापूर जिल्ह्यात त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यांच्या कन्या प्रणिती या देखील आमदार आहेत. अशातच आता भाजपने ऑफर दिल्याचा दावा शिंदेंनी केला आहे.