BRS पक्षाची ऑफर? गुणरत्न सदावर्ते यांनी ‘या’ तीन शब्दांचा उल्लेख करत ऑफर धुडकावून लावली, म्हणाले…
Gunaratna Sadavarte on BRS offer : व्हाट्सअॅप जिहादला प्रत्युत्तर म्हणून आम्ही अखंड भारत आणि नथुराम गोडसे यांचा फोटो स्टेटसला ठेवणार; गुणरत्न सदावर्ते आक्रमक

सोलापूर : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना बीआरएस पक्षाची ऑफर असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. ती ऑफर गुणरत्न सदावर्तेंनी धुडकावून लावली. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या विचारधारेचाही उल्लेख केला आहे. नथूराम गोडसेची विचारधारा आणि महात्मा गांधी यांच्यावर भाष्य केलंय. तसंच व्हाट्सअॅप जिहादाची उल्लेख त्यांनी केला आहे. सोलापुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय.
ऑफर,सेल, डिस्काउंट हे विचार पायदळी तुडवावेत. थुंकून टाकले पाहिजेत. विचाराला ऑफर नसते! सेल नसते तर विचारांची देवाण घेवाण होत असते. जे पक्ष ऑफर देतायेत ते काँग्रेसी विचारांचं गलिच्छ राजकारण आहे, असं मी समजतो. त्या विचारांशी आमचे कधीही जोडू शकत नाही कारण आमचा विचार अखंड भारताचा, प्रभू रामचंद्रांच्या पायाशी आमचा विचार आहे. हैद्राबादमधून पोस्टर आणून चिटकवतात. हे चिटकवा चिटकवीचं राजकारण फार काळ टिकत नाही, असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी बीआरएसच्या ऑफरच्या चर्चा धुडकावून लावल्या आहेत.
स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अॅड. गुणरत्न सदावर्ते हे सोलापुरात होते. त्यांचं एसटी कामगारांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यासोबत ठेचा-चपाती असं जेवण केलं. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
औरंगजेबचे स्टेटस ठेवणे म्हणजे व्हाट्सअॅप जिहाद आहे. लव्ह जिहादप्रमाणेच व्हाट्सअप जिहाद केला जातोय. मात्र व्हाट्सअॅप जिहादला प्रत्युत्तर म्हणून आम्ही अखंड भारत आणि नथुराम गोडसे यांचा फोटो स्टेटसला ठेवणार आहे, असं सदावर्ते म्हणाले.
नथुरामजींचा अखंड भारताचा विचार आम्ही संपू देणार नाही. अखंड भारताचे विचार आणि नथुरामजींच्या विचाराच्या कोणी आड येत असेल तर ते सुपूर्द ए खाक केल्याशिवाय राहणार नाही. यूपीमध्ये गुंडांना ज्याप्रमाणे खात केले त्याप्रमाणेच खाक करणार, असंही ते म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकला यावर आधी लव्ह जिहाद, लँड जिहाद दाखवला आता व्हाट्सअप जिहाद सुरू आहे. औरंगजेब विचारांना उखडून टाकून चालत नाही तर अमेरिकेने लादेनला ज्याप्रमाणे समुद्रात नेऊन टाकलं तसं टाकावं लागणार आहे. आजपासून आम्ही आमच्या स्टेटसला अखंड भारताचा नकाशा ठेवणार आहोत. कोणाची ताकद आहे, त्याने आडवून दाखवावं, असं सदावर्ते म्हणाले आहेत.