माढ्याचा तिढा सुटला?; ‘तो’ बडा नेता शरद पवारांच्या भेटीला, उमेदवारी निश्चित?
Pravin Gaikwad Meet Sharad Pawar in Delhi For Loksabha Election 2024 : माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा सुटला? दिल्लीत नेमकं काय घडलं? कोणत्या नेत्याने शरद पवार यांची भेट घेतली? 'त्या' नेत्याची उमेदवारी निश्चित झाली? नेमकं काय घडतंय? वाचा सविस्तर...
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशात काही मतदारसंघावरून दोन्ही आघाड्यांमध्ये पेच पाहायला मिळतो आहे. महाविकास आघाडीतही काही जागांवर तिढा असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र आता हा तिढा सुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण एका बड्या नेत्यानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे माढ्याचा तिढा सुटल्याची माहिती आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून स्वत: शरद पवार लोकसभा निवडणूक लढतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांचीही तशी भावना आहे. शिवाय इतरही काही नेत्यांनी शरद पवारांकडे लोकसभेचं तिकीट मागितलं आहे. मात्र बड्या नेत्याच्या भेटीने माढ्याची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. दिल्लीत या दोघांची भेट झाली आहे. यावेळी निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना शरद पवार यांनी प्रविण गायकवाडांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 3 तारखेला माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटणार असल्याची माहिती आहे.
प्रविण गायकवाड आणि शरद पवार यांच्या भेटीचा फोटो
पवारांचा शिंदेंना धक्का
माढ्यातील जागा महाविकास आघाडीने जिंकावी यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. यासाठी शरद पवार स्वत: रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. माढ्यातील शिंदे गटाचे नेते संजय कोकाटे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये संजय कोकाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश होणार आहे. भाजपचे काम करणार नाही, असं म्हणत संजय कोकाटे यांनी शिवसेनेला सोडचिट्टी दिली आहे.
माढा तालुक्यातील बबनराव शिंदे यांच्या विरोधात मी विधानसभा लढणार असल्याचे देखील जाहीर केलं आहे. माढ्यातील जुलमी आणि भ्रष्टाचारी राजवट घालवण्यासाठी मी लढा उभारला आहे. माढा लोकसभेला तुतारी चिन्हावर उभारलेल्या उमेदवाराचा जोरदार प्रचार करणार आहे, असं संजय कोकाटे यांनी स्पष्ट केलं आहे.