तुमच्याच गावात तुम्हालाच जमावबंदी, हा कुठला कायदा?; मारकडवाडीत उभं राहून शरद पवारांचा सवाल
Sharad Pawar Speech at Markadwadi : शरद पवार आज मारकडवाडीत आहेत. यावेळी गावकऱ्यांशी बोलताना शरद पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले. तसंच ईव्हीएमवरदेखील शरद पवार बोलले आहेत. शरद पवार यांनी अमेरिकेचं उदाहरण दिलं, मारकडवाडीत उभं राहून शरद पवारांनी काय म्हटलं?
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघ देशभर चर्चेत आला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तमराव जानकर विजयी झाले आहेत. मात्र जानकर यांच्या समर्थकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात उत्तम जानकर यांना कमी मतं मिळाली. तर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी अधिक मतं मिळाली. पण या गावात जानकरांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे जानकरांना कमी मतं कशी मिळाली? या संशोधनाचा विषय असल्याचं मारकडवाडीकरांचं मत आहे. या गावाला शरद पवार यांनी भेट दिली आहे.
शरद पवारांचा सवाल
मारकडवाडी गावात मॉक पोलिंग (बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान) घेण्यात येणार होतं. संपूर्ण तयारी पूर्ण झाली होती. मात्र मतदानाच्या दिवशी या गावात पोलिसांकडून जमावबंदी लागू करण्यात आली आणि हे मॉक पोलिंग झालं नाही. याचवरून शरद पवार यांनी मारकडवाडीत बोलताना सवाल केला आहे. तुमच्याच गावात तुम्हालाच जमावबंदी, हा कुठला कायदा?, असा सवाल पवारांनी विचारला आहे.
आपल्या देशात ईव्हीएम पद्धत स्वीकारली त्यात बदल केला पाहिजे. मतदान झाल्यावर गावाकऱ्यांच्या मनात शंका आली. मग गावाने ठरवले की गावात पुन्हा एकदा बॅलेटवर मतदान करावे. मग पोलिसांनी त्याला विरोध का केला? तुमच्याच गावात जमावबंदी केली हे कसं काय? गावाने ठरवले की एका नव्या दिशेने जायचे तर मग विरोध का?, असा प्रश्न शरद पवारांनी केलाय.
पवार मारकडवाडीत काय म्हणाले?
लोकसभा, राज्यसभेत आम्ही पाहतोय की अनेक खासदार आम्हांला भेटतात आणि तुमच्या गावाची चर्चा करतात. सगळे खासदार आम्हाला विचारतात की हे गाव आहे कुठे. त्यामुळे गावाचे अभिनंदन आहे. ईव्हीएमबाबत लोकांच्या मनात काही शंका निर्माण का झाली. राज्यात काही ठिकाणी निवडणूक झाल्यावर शंका का आली? अमेरिका, इंग्लंड, या देशात ईव्हीएमवर मतदान होत नाही. अमेरिकेने ईव्हीएमचा विचार केला पण नंतर त्यांनी तो बदलला. आमच्या देशात पण ईव्हीएमवर शंका आली, असं शरद पवार म्हणालेत.