सोलापूर : डोंबिवलीत पाच जणांचा बुडून मृत्यू झालेल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. खेळता खेळता तीन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू (3 kids drown) झाला. सोलापुरातील मोहोळ (Mohol, Solapur) तालुक्यात ही घटना घडली. शेततळ्यात पडून तिघे चिमुरडे बुडाले आणि पाण्यात गुदमरुन त्यांचा जागीच जीव गेला. ही बाब कुटुबीयांच्या लक्षात आल्यानंतर चिमुरड्यांच्या आई-वडिलांनी आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. सोमवारी दुपारी ही घटना घडली. सोलापूरच्या (Solapur News) मोहोळ तालुक्यातील शेटफळ इथं घडलेल्या या घटनेनं संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जाते आहे. विनायक भरत निकम, सिद्धेश्वर भरत निकम, हे दोघे सख्खे भाऊ खेळता खेळता शेततळ्यात बुडाले. यावेळी त्यांसोबत कार्तिक मुकेश हिंगमिरे हा देखील त्यांच्यासोबत खेळत होता. त्याचाही बुडून मृत्यू झाला. विनायकचं वय 12 वर्ष, सिद्धेश्वरचं वय 8 वर्ष तर कार्तिक हा अवघ्या पाच वर्षांचा होता. या धक्कादायक घटनेनं निकम आणि हिंगमिरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर या गावातील भरत निकम हे शेत मजुरीचं काम करतात. ते शेतमजुरी करण्यासाठी शेटफळ इथं आपल्या मेहुण्याकडे आले होते. मुकेश ज्योतिनाथ हिंगमिरे यांच्याकडे शेतमजुरीसाठी आलेल्या निकम कुटुंबातील दोघा सख्ख्या भावांची आणि हिंगमिरे यांच्या चिमुरड्यासोबत गट्टी जमली होती. गेल्या काही महिन्यांपासून ही दोन्ही कुटुंब शेटफळ इथं काम करत होते. सकाळी दोघेही मजुरीसाठी गेले होते. आई-वडील मजुरीसाठी गेल्यानंतर तिघेही खेळत होतं. दुपारी शेततळ्याकडे पोहायला तिघेजण गेले. यावेळी पाय घसरुन तिघेही पडले आणि शेततळ्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.
मजुरीवरुन जेव्हा आई-वडील घरी परतले, तेव्हा मुलं कुठंच दिसत नाही म्हणून घाबरले होते. मुलांची शोधाशोध करण्यात आली. मुलांची चौकशी करताना आईला शेततळ्याजवळ मुलांच्या चपला दिसल्या आणि त्यानंतर मातेचा धीर सुटला.
मुलांचे मृतदेह पाण्यात पाहताच काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश आई-वडिलांनी केला. तिघा चिमुरड्यांच्या मृत्यूनं निकम आणि हिंगमिरे कुटुंबीयांना मोठा धक्का दिलाय. तर संपूर्ण गावातही या घटनेनं शोककळा पसरली. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.