सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे आज स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याच अनावरण झालं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपा नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. गणपतराव देशमुख यांच्या पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोन्ही दिग्गज नेते एकाच मंचावर आले आहेत. ते काय बोलणार? याची सगळ्या राज्याला उत्सुक्ता लागून राहिली आहे. गणपतराव देशमुख हे सोलापूर जिल्हयातील एक लोकप्रिय नेते होते.
त्यांनी तब्बल 11 वेळा विधानसभेची निवडणूक जिंकली होती. त्याच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाला आज सांगोल्यात मोठी गर्दी झाली आहे. गणपतराव देशमुख यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते इतर आमदारांसारखे स्वत:च्या गाडीने प्रवास नाही करायचे. महाराष्ट्रीय शासनाच्या एसटी बसने ते प्रवास करायचे. अशा या लोकप्रिय नेत्याच्या पुतळ्याच आज अनावरण करण्यात आलं.
व्यासपीठावर कुठले दिग्गज नेते उपस्थित?
या कार्यक्रमाला व्यासपीठावर शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे, संजय शिंदे, यशवंत माने हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. आमदार शहाजी बापू पाटील हे गणपतराव देशमुख यांच्याबद्दल बोलताना भावूक झाले.
गणपतरावांबद्दल बोलताना शहाजी बापू पाटील भावूक
“गणपतराव यांच्या व्यक्तीमत्वाचे चांगले पैलू म्हणून पवार-फडणवीस एकत्र दिसतायत” असं शहाजी बापू पाटील म्हणाले. “गणपतराव यांच्याविरुद्ध आपण लढलो. आपण पराभूत झाल्यावर आपणास गणपतराव देशमुख साहेब बोलवून परत कामाला लागा असं सांगायचे आणि आपणास निवडणूक लढवायची ऊर्जा द्यायचे” हे सांगताना शहाजी बापू पाटील गणपतराव देशमुख यांच्या आठवणीत भावूक झाले.