वटसावित्रीच्या पूजेवरून महिला संघटनेचा संभाजी भिडेंना इशारा; म्हणाल्या, तुमच्या मिशा…
Vidya Lolage on Sambhaji Bhide Controversial Statement : संभाजी भिडे यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. महिला संघटनांनी यावर आक्षेप घेतला आहे. संभाजी भिडे यांना महिला संघटनेचे इशारा दिला आहे. वाचा सविस्तर बातमी......
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका संपत नाहीये. वटसावित्रीच्या पूजेवरून संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनीच जावं, असं संभाजी भिडे पुण्यात बोलताना म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर महिला संघटनांनी आक्षेप घेतला आहे. सोलापुरातील वर्ल्ड ऑफ वूमन्स (WOW) या महिला संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांनी संभाजी भिडे यांना इशारा दिला आहे. संभाजी भिडे यांनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नये. अन्यथा आम्ही त्यांच्या मिशा कापू…, असा इशारा वर्ल्ड ऑफ वूमन्स या महिला संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांनी दिला आहे.
संभाजी भिडेंना महिला संघटनेचा इशारा
नुकतच संभाजी भिडे यांनी महिलाबद्दल वटपौर्णिमेबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. या विधानावरून सोलापुरातील महिला संघटक आक्रमक झाल्या आहेत. संभाजी भिडे यांनी महिलांच्या वाटेला जाऊ नये. त्यांची अशी विधानं खूप अति होत आहेत. आता त्यांची ही असली विधानं ऐकवली जातं नाहीत. संभाजी भिडे यांनी हे कोण आहेत? आम्ही काय करावं आणि काय करू नये, हे सांगणारे… ते आमचं घर चालवत नाहीत. यापुढे त्यांनी असे वादग्रस्त वक्तव्य केलं. तर त्यांचे पेहराव असणाऱ्या धोतरावर आम्हीही बोलू शकतो. त्यांना एवढंच वाटत असेल तर त्यांनी वाढवलेल्या मिशा ही आम्हाला कापाव्या लागतील, असं विद्या लोलगे म्हणाल्या आहेत.
संभाजी भिडे यांची दोन आक्षेपार्ह विधानं
वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनी जावं, असं महिलांबाबत आक्षेपार्ह विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. तसंच देशाच्या स्वातंत्र्याबाबतही संभाजी भिडे यांनी काल पुण्यात बोलताना विधान केलंय.
संपूर्ण देशात हिंदवी स्वराज्याचं व्रत घेतलेली लोकं आपल्याला तयार करायची आहेत. आपल्या जे स्वातंत्र्य मिळाला ते हांडगं स्वातंत्र्य आणि दळभद्री स्वातंत्र्य आहे. हिंदवी स्वराज्य हे खर स्वातंत्र्य आहे, असंही संभाजी भिडे म्हणाले आहेत.