साईंच्या दर्शनासाठी जात होते, पण काळाने घाला घातला; कारच्या अपघातात चौघांचा मृत्यू
Solpaur Karmala Car Accident 4 Death : कार आणि कंटेनरचा भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या या भाविकांचा असा अपघात झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांच्या घरी शोकाकूल वातावरण आहे. वाचा सविस्तर बातमी...
करमाळा, सोलापूर | 28 डिसेंबर 2023 : देवदर्शनासाठी जात असताना मन प्रसन्न असतं. आपल्या देवाच्या दर्शनाची ओढ मनात असते. पण देवदर्शनासाठी जात असताना अपघात झाला तर ही घटना जिव्हारी लागते. अशीच घटना सोलापुरात घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामध्ये भीषण अपघात झाला. देवदर्शनासाठी निघालेल्या कारचा अपघात झाला. आज पहाटे कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या या भाविकांचा असा अपघात झाल्याने स्थानिकांनीही हळहळ व्यक्त केली.
कर्नाटकातील गुलबर्गा इथून देवदर्शनासाठी हे भाविक शिर्डीला जात होते. याचवेळी काळाने घाला घातला. करमाळ्यातील परांडा-करमाळा राज्यमार्गावर पांडे गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात श्रीशैल चांदेगा कुंभार (वय ५५), शशिकला श्रीशैल कुंभार (वय ५०), ज्येमी दीपक हुनशामठ (३८ रा. गुलबर्गा) आणि शारदा हिरेमठ (वय ६७, रा. हुबळी) या चौघांचा मृत्यू झाला आहे. तर या कारमधील जखमींना उपचारांसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अपघात वार…; आणखी एक कार अपघात
येवला मनमाड महामार्गावरील कासारखेडा फाट्याजवळ टाटा मॅजिक आणि इरटिगा कारमध्ये अपघात होऊन सात ते आठ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातातील जखमींना येवला शासकीय रुग्णालयामध्ये उपचार करता दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामध्ये लहान बालकांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. अपघात झाल्याने स्थानिक मदतीला धावले. त्यांनी त्वरित जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवलं.
अमरावतीतही अपघात
अमरावतीतही भीषण अपघात झाला आहे. अमरावती चांदुरबाजार रोडवरील नांदुरा गावाजवळ भीषण अपघात झाला. लग्ना समारंभात जाणाऱ्या ऑटोचा अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय. तर चार मजूर गंभीर जखमी झालेत. सिमेंट मिक्सर ट्रक आणि ऑटोची जोरदार धडक धडक झाली. अमरावतीकडे जाणाऱ्या ऑटोला ट्रकने जबर धडक दिली. यात तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे.तर जखमींवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत.