चंद्रकांत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम झालाय, असं सुषमा अंधारेंनी सांगितलं, पण कार्यक्रम नेमका केला कोणी…
शाईफेक हल्ला झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांची प्रतिमा खराब करण्यासाठी भाजपमधूनच प्रयत्न केले गेले आहेत.
सोलापूरः ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा सध्या वेगवेगळ्या भागात जात आहे. आज सोलापूरमध्ये महाप्रबोधन यात्रेच्यानिमित्ताने ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत सगळ्यांवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात शाईहल्ला झाल्यानंतर ज्या व्यक्तीनी शाईफेक केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. चंद्रकांत पाटील यांनी गुन्हे दाखल करू नका असं सांगितल्यानंतरही गुन्हे दाखल केले गेले.
त्यामुळे त्यांचा शब्द भाजपकडून पाळण्यात आला नाही हे सिद्ध झाले. त्यानंतरही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या प्रकरणाची चौकशी लावून गुन्हे दाखल करण्यास सांगितले.
तर राम कदम यांनी ज्यांनी शाईफेक केली त्यांना त्यांच्या घरात घुसून मारण्याची भाषा करण्यात आली. त्यामुळे चंद्रकांत पाटील या हल्लाप्रकरणी एक वक्तव्य करतात तर भाजपचे नेते दुसरंच वक्तव्य करतात असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला.
शाईफेक झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी गुन्हे दाखल करू नका असं सांगूनही चंद्रकांत पाटील यांची फक्त प्रतिमा बिघडवण्यासाठी गुन्हे दाखल केले गेले असंही त्यांनी यावेळी सांगितले.
शाईफेक हल्ला झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांची प्रतिमा खराब करण्यासाठी भाजपमधूनच प्रयत्न केले गेले आहेत. कधी देवेंद्र फडणवीस तर कधी राम कदम यांच्या वक्तव्यामुळे जनसामान्यांचा रोष वाढवा यासाठी सातत्याने प्रयत्न केले गेले आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांचा कार्यक्रम होण्यास सुरुवात झाल्याचीही टीका त्यांनी केली आहे.
महाविकास आघाडीवर भाजप आणि शिंदे गटाकडून टीका करताना शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मांडीवर बसवून घेतलं आहे अशी खोचक टीका करण्यात येते. त्याच्यावर सुषमा अंधारे यांनी बोलताना सांगितले की, शिवसेनेला मांडीवर सन्मानानं तरी बसवून घेतलं आहे पण शिंदे गटाला भाजपनं पायाजवळ ठेवलं आहे असा जोरदार घणाघात सुषमा अंधारे यांनी केला आहे.