कुर्डूवाडीहून बार्शीला चालले होते, पण वाटेतच दुचाकीवरील नियंत्रण सुटले अन्…
पंढरपूरहून बार्शीला दोघे तरुण दुचाकीवरुन चालले होते. मात्र बार्शीला पोहचण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. घरुन बार्शीला जाण्यासाठी बाहेर पडले, पण पुन्हा घरी परतलेच नाहीत.
सोलापूर / सागर सुरवसे : बार्शी-कुर्डूवाडी रोडवर रस्त्यावर उभ्या असणाऱ्या टेम्पोवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. शेंद्री फाट्याजवळ ही घटना घडली आहे. यामध्ये जागीच दोघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मधुसूदन मुरलीधर जाधव, ऋषिकेश संतोष जाधव यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोघेही पंढरपूर तालुक्यातील रहिवासी आहे. बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.
दुचाकीने उभ्या टेम्पोला धडक दिल्याने अपघात
मधुसूदन जाधव, ऋषिकेश जाधव हे कुर्डूवाडीवरून बार्शीच्या दिशेने दुचाकीवरुन निघाले होते. शेंद्री फाट्याजवळ येताच दुचाकी रस्त्यावर उभ्या असलेल्या टेम्पोला पाठीमागून दुचाकीने धडक दिली. या अपघातामध्ये दोघेही रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यातून रक्तस्त्राव होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, अपघात नेमका कसा घडला याबाबत कळू शकले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.
गोंदियात ट्रकखाली चिरडून बालकाचा मृत्यू
दुकानातून घरी जात असलेल्या 9 वर्षाच्या बालकाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने चिरडल्याची घटना गोंदिया शहरात घडली आहे. यानंतर संतप्त जमावाने ट्रकच पेटवून दिला. शहरातील बाजपाई चौकात काल सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. रामनवमीचा उत्सव तसेच रमजान महिना सुरू असल्यामुळे परिस्थिती चिघळू नये, म्हणून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.