असाही एक शिवप्रेमी, सायकलने शेकडो किल्ल्यांना भेट; महाराष्ट्रातील किल्ल्यांची भूरळ
हमरास श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम आणि अलौकिक कार्यातून प्रेरणा संकलित करत आहे. महाराजांच्या युद्धनीती, हिंदवी स्वराज्यासाठी दिलेल्या लढा आदींचा अभ्यास चिंतन केले.
शितलकुमार मोटे, प्रतिनिधी, सोलापूर : शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेणारे लाखो लोकं या जगात आहेत. महाराष्ट्रात घरोघरी शिवाजी महाराज यांचे चाहते आहेत. केरळमध्येही एक त्यांचा चाहता आहे. यापूर्वी या चाहत्याला शिवाजी महाराज यांच्याबदद्ल माहिती नव्हती. माहीत झालं तेव्हा तो भारावून गेला. शिवाजी महाराज यांचा अभ्यास करण्याचे त्याने ठरवलं. आता तो किल्ल्यांची भ्रमंती करत आहे. शिवाजी महाराजांशी संबंधित व्यक्तींच्या भेटी घेत आहे.
हमरासला वयाच्या 23 वर्षापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कसलीच माहिती नव्हती. सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे व्हिडीओ पाहून भारावून गेला. महाराजांच्या युद्धनीती, हिंदवी स्वराज्यासाठी दिलेल्या लढा आदींचा अभ्यास चिंतन केले. हमरास श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम आणि अलौकिक कार्यातून प्रेरणा संकलित करत आहे.
हमरासचे शिक्षण बी.कॉम.पर्यंत झाले आहे. तो सौदी अरेबिया आणि दुबई येथे वाहनचालकाचे काम करत होता. त्यानंतर पुन्हा भारतात आला. केरळमधील बेकील किल्ल्यापासून त्याने प्रवासास सुरुवात केली आहे.
370 किल्ल्यांना देणार भेट
एम. के. हमरास या अवलियाला महाराष्ट्रातील किल्ल्यांची भुरळ पडली. सायकलवर प्रवास करत आतापर्यंत 165 किल्ल्यांना भेट दिली. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा असाही जबरा फॅन आहे. केरळ राज्यातील छोट्याशा गावातून सायकलवर निघालेल्या एम.के हमरास याने आतापर्यंत 165 किल्ल्यांना भेटी दिल्या. 370 किल्ल्यांना तो भेटी देणार आहे.
यांना दिल्या भेटी
एम. के. हमरासचे मराठा फोर्ट्स, दुर्गभ्रमंती, दुर्गजागर यांच्यावतीने करमाळा येथे स्वागत करण्यात आले. या प्रवासादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे, संभाजीराजे, शिवेंद्रराजे व शिवप्रेमींनी मदतीचा हात दिला आहे. मराठा फोर्ट्स आणि दुर्गभ्रमंती दुर्गजागरचे अध्यक्ष राहुल पवार यांनी हमरासचे स्वागत केले.
एक मेपासून २०२२ पासून निघाला प्रवासाला
एम. के हमरास 1 मे 2022 पासून सायकलवरून गड किल्ल्यांच्या प्रवासाला निघाला. 11 महिन्यात 8 हजार 550 किलोमीटरचा प्रवास केला. यादरम्यान हमरासने 165 किल्ल्यांना भेटी दिल्या असल्याचे सांगितले.