Vitthal Mandir : दर्शनाला आले “राव” भाविकांची धावाधाव, विभागीय आयुक्तांमुळे किलोमीटरच्या रांगा, तर मंदिरातील लेपन प्रक्रियाही पूर्ण
आज द्वादशी आणि रविवार असल्याने पंढरपूरमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. दोन किलोमीटर दर्शन रांग गेली आहे. सध्या 4 ते 5 तास वेळ दर्शनासाठी लागत आहे. अशातच रांग बंद करून व्हीआयपी दर्शन देण्याचा हट्ट मंदिर प्रशासनानं धरला. त्यामुळे आता भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे.

पंढरपूर : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात (Pandharpur Vitthal mandir) रोज दर्शनाला हजारो भाविक येत असतात. त्यात आता आषाढी वारी जवळ आली असल्याने दिवसेंदिवस मंदिरात (Vitthal Mandir) भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र आज मंदिरात भक्तांना तासंतास रांगेत ताटकळत उभं राहवं लागलंय. आणि त्याला कारण ठरलंय, विभागीय आयुक्त सौरभ राव यांची पंढरपूर वारी. विभागीय आयुक्त सौरभ राव (Sourabh Rao)दर्शनासाठी पंढरपूरला पोहोचले. मात्र पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या व्हीआयपी दर्शनासाठी वारकऱ्यांची दर्शन रांग थांबवली, त्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय झाल्याचे दिसून आले. आज द्वादशी आणि रविवार असल्याने पंढरपूरमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. दोन किलोमीटर दर्शन रांग गेली आहे. सध्या 4 ते 5 तास वेळ दर्शनासाठी लागत आहे. अशातच रांग बंद करून व्हीआयपी दर्शन देण्याचा हट्ट मंदिर प्रशासनानं धरला. त्यामुळे आता भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे.
भाविकांची गर्दी वाढली
पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक हे पंढरपुरात दाखल होतात. नियमित दिवशीही पंढरपुरात दर्शनासाठी वेळ लागतो. मात्र अशा व्हीआयपी दर्शनामुळे भक्तांना आणखी काही तास रांगेत उभं राहवं लागलं आहे. अशी वेळ ही पहिल्यांदाच आली नाही. याआधीही अशा व्हीआयपी दर्शनामुळे भाविकांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे आता वारकरी वर्ग नाराज आहे. ऐन वारीच्या तोंडवरचा हा प्रकार सध्या पंढरपुरात चर्चेत आहे. त्यामुळे आता वारकरी आक्रमक होण्याची शक्यता आहे.
लेपन प्रक्रिया पूर्ण
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या रूक्मिणी मातेच्या मूर्तीच्या चरणावरील लेपन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही प्रक्रिया रात्री आणि दिवसा मिळून पाच ते सहा तास चालली होती. सिलिकॉन पावडर आणि इतर साहित्य वापरून झीज झालेल्या ठिकाणी चरण पूर्ववत केले. औरंगाबाद येथील भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी श्रीकांत मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ही लेपन प्रक्रिया पार झाली.
पदस्पर्श दरर्शन बंद राहणार
दरम्यान आज दिवसभर रूक्मिणी मातेचे नित्योपचार आणि पदस्पर्श दरर्शन बंद राहणार आहे.रूक्मिणी मूर्तीच्या चरणाची झीज झाली होती. त्यानंतर भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंदिरात येवून मूर्तीची पाहाणी केली होती. त्यानंतर काल रात्री मूर्तीच्या चरणावर लेपन प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आणि आज दुपारी ती प्रक्रिया पुर्ण झाली असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.