सीमावादाची ठिणगी सोलापूरातच पडली, तरीही आमदार, खासदारांचे मौन का..?
एकीकडे पूर्ण कर्नाटक एकवटलं आहे मात्र एक-दोन अपवाद वगळता सोलापुरातले सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी मात्र आता गप्प का आहेत असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
मुंबईः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरु होऊन दोन आठवडे झाले आहेत. मात्र सोलापूरच्या खासदारांनी अजूनही मौन बाळगलं आहे. एक-दोन अपवाद वगळता सोलापूरचे सर्वपक्षीय आमदारसुद्धा कर्नाटक सीमावादावर बोलताना दिसत नाहीत. त्यामुळे ज्या सोलापूरवरुन सीमावादाची नवी ठिणगी पडली आहे त्या ठिकाणचेच नेते शांत का असा सवाल आता उपस्थित होत आहे.
सीमावादावरुन बेळगावमध्ये कर्नाटकची दादागिरी सुरु झाली आहे तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई अकलेचे तारे तोडता आहेत. त्यामुळे सोलापूर आणि अक्कलकोटवर कर्नाटकने स्वतः दावा सांगत आहे.
त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून हा वाद धुमसतो आहे मात्र सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांनी यावर चकार शब्दही काढलेला नाही.
तर मुलभूत सुविधांअभावी अक्कलकोट आणि दक्षिण सोलापुरातल्या 28 गावांनी कर्नाटकात सामील होण्याचा इशारा दिला आहे. यावरही आत खासदार जयसिद्धेश्वर स्वामी मौन बाळगून आहेत.
महाराष्ट्रातले अनेक मंत्री या भागात भेटी देऊन गेले आहेत मात्र खासदार महोदयांनी कर्नाटकात जाण्याचा इशारा देणाऱ्या मराठी ग्रामस्थांनी फोनवरुन साधा संपर्कही साधलेला नाही हे वास्तव आहे.
सीमावाद पेटण्याची खरी सुरुवात कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी 24 नोव्हेंबर रोजी मराठी गावांवर दावा सांगण्यापासून झाली. त्या 24 नोव्हेंबरपासून ते 5 डिसेंबरपर्यंत खासदार जयसिद्धेश्वर स्वामी सोलापुरातच होते. मात्र आपल्या हद्दीतच इतका वाद सुरु असताना खासदारांचे मौन का असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
एकीकडे पूर्ण कर्नाटक एकवटलं आहे मात्र एक-दोन अपवाद वगळता सोलापुरातले सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी मात्र आता गप्प का आहेत असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत, सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख, सोलापूर दक्षिणचे सुभाष देशमुख, पंढरपूरचे समाधान आवताडे, माळशिरसचे राम सातपुते याशिवाय करमाळ्याचे राष्ट्रवादी पुरस्कृत आमदार संजय शिंदे, माढ्याचे बबन शिंदे, मोहोळचे यशवंत माने, सोलापूर शहर मध्यच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे, देखील सोलापुरातल्या सीमावादावर बोलण्यास नकार देत आहेत.
फक्त अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन शेट्टी आणि सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटलांनी प्रतिक्रिया देत कर्नाटकला इशारा दिला आहे.
महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकातही खासदार जयसिद्धेश्वर स्वामींना माननारा मोठा वर्ग आहे. सोलापूर आणि अक्कलकोटमध्ये खासदारांचा मट सुद्धा आहे इतंकच नाही तर कर्नाटकचे आजी मुख्यमंत्री बोम्मई आणि माजी मुख्यमंत्री येदीयुराप्पांशी खासदारांचे चांगले संबंध आहेत. पण तरीही सीमावादावर खासदार जयसिद्धेश्वर स्वामी मौन का आहेत, याचं उत्तर मिळत नाही आहे.