लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प, आर्थिक तंगीला कंटाळून चंद्रपूरमध्ये सलून चालकाची आत्महत्या
चंद्रपुरातील उर्जानगर-नेरी येथे राहणाऱ्या सलून चालकाने आर्थिक तंगीला कंटाळून आत्महत्या केली (Soloon owner Suicide due to Financial crisis)
चंद्रपूर : राज्यात 4 टप्प्यातील लॉकडाऊनंतर आता अनलॉकचा पहिला टप्पा देखील आला मात्र, अद्यापही सलून चालकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे सलून व्यवसाय ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रपुरातील उर्जानगर-नेरी येथे राहणाऱ्या सलून चालकाने आर्थिक तंगीला कंटाळून आत्महत्या केली (Soloon owner Suicide due to Financial crisis) . यामुळे चंद्रपूरमध्ये एकच खळबळ उडाली. स्वप्नील चौधरी असं या 27 वर्षीय सलून चालकाचं नाव आहे. त्याने घरीच गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं.
मृत सलून चालकाच्या आई-वडिलांचं वर्षभरापूर्वीच निधन झालं होतं. यानंतर त्याने शहराच्या अयप्पा मंदिराजवळ छोटं सलूनचं दुकान सुरु केलं होतं. त्याच्यावरच त्याचा उदरनिर्वाह सुरु होता. मात्र, लॉकडाऊनमुळे मागील मोठा काळ त्याला आर्थिक तंगीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. अखेर त्याने याला कंटाळून आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. दुर्गापूर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
सलून चालक स्वप्निल चौधरी छोट्याशा झोपडीवजा घरात एकटाच वास्तव्याला होता. त्याच्या मातापित्यांचे याआधीच निधन झाले होते. 85 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे शहराच्या अय्यप्पा मंदिर परिसरात असलेले त्याचे छोटे टपरीवजा दुकान सतत बंद राहिले. यामुळे त्याच्यावर आलेल्या आर्थिक संकटाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. गेले काही दिवस तो जवळच्या नातेवाईकांशी यासंदर्भात व त्याच्यावर असलेल्या कर्जा संदर्भातही बोलत होता. जवळच्या नातेवाईकांनी त्याला याबाबत धीरही दिला. मात्र, आर्थिक संकट आणि सलून व्यवसाय सुरळीत न होण्याची चिन्हे यामुळे त्याने आज हे पाऊल उचललं.
दरम्यान दुर्गापूर पोलिसांनी त्याचा मृतदेह तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला आहे. जोपर्यंत स्वप्निलच्या मृत्यूची नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आपण प्रेत उचलणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. दुर्गापूर पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. त्याने याआधी नातेवाईकांशी केलेली बातचीत व त्याच्या या व्यवसायावर आलेले संकट याबाबतीतही आपल्या तपासात पोलीस चौकशी करणार आहोत.
कोरोना या साथरोगाच्या संकटाने सर्वच व्यवसायांवर मंदीचे सावट आले आहे. केंद्र व राज्य सरकारने अनलॉक-1 मध्ये अनेक व्यवसाय व दुकानांना उघडण्याची सशर्त परवानगी दिली. मात्र, यात अद्यापही सलून-मसाज पार्लर यांचा समावेश नाही. लॉकडाऊनच्या दीर्घ कालावधीला आता 85 दिवस उलटले आहेत. गेले काही दिवस सतत बंद असलेल्या सलून व्यवसायावर आधारित कामगार मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
लॉकडाऊनमुळे राज्यासह देशात मोठे आर्थिक दुष्परिणाम जाणवत आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या व्यावसायिकांनी यावर मात केली आहे. मात्र, छोट्या व्यावसायिकांचे लॉकडाऊन दरम्यान हाल होत आहेत. यातून तातडीने मार्ग न निघाल्यास परिस्थिती बिकट होत जाणार आहे. दीर्घ लॉकडाऊनच्या आर्थिक संकटाला कंटाळून आता सलून व्यावसायिकांच्याही आत्महत्येच्या घटना समोर यायला लागल्याने काळजीचं वातावरण आहे.
हेही वाचा :
Depression | नैराश्य म्हणजे नेमकं काय? नैराश्याने आत्महत्येचा विचार का येतो?
‘वारणा कामगार सोसायटी’च्या संचालकाची हत्या, देवपूजा करताना पत्नीकडून डोक्यात हातोडा
Soloon owner Suicide due to Financial crisis