शिर्डी : देशात हुकूमशाही व एकाधिकारशाही वाढवणाऱ्या भाजप सरकारने (BJP Government) सातत्याने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) व खा.राहुल गांधी यांना दिलेली ईडीची नोटीस ही लोकशाहीची चिंता वाढवणारी असून संपूर्ण देशातील जनता व काँग्रेसजन सोनिया गांधी यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन विधिमंडळ पक्षनेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले आहे. शिर्डी येथे काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी समवेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रवक्ते अतुल लोंढे, डॉ. सचिन सावंत, आशिष दुवा आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना नामदार थोरात म्हणाले की ,केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना नामोहरम करण्याचे काम भाजप सरकार करत आहे . देशात जातीय व धार्मिक तेढ निर्माण करून लोकशाहीवर आघात त्यांनी सुरू केला आहे.
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी व राहुल गांधी यांना दिलेल्या ईडीच्या नोटीस अत्यंत दुर्देवी असून लोकशाहीची चिंता वाढवणारी आहे. भाजपा सरकारकडून सातत्याने लोकशाहीवर आघात होत आहे. हे देशाच्या दृष्टीने चांगले नाही. या प्रकरणी संपूर्ण संपूर्ण देशातील जनता आणि काँग्रेसजन हे सोनियाजी गांधी यांच्या पाठीशी खंबीर उभी असून भाजपच्या या चुकीच्या दडपशाहीमुळे देशातील जनतेमध्ये प्रचंड रोष व असंतोष निर्माण झाले असल्याचेही थोरात यांनी म्हटले आहे . त्यामुळे आता नोटीसीवरून राजकारणाचा माहौल चांगलाच तापला आहे. काँग्रेस नेते आता चांगलेच आक्रमक मोडवर आले आहेत. तर भाजप नेत्यांकडूनही यावरून जोरदार पलटवार केले जात आहेत. यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
तर या पत्रकार परिषदेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, उदयपूर संकल्प शिबिरातील अर्थकारणाच्या गटातून मोदी सरकारच्या सध्याच्या धोरणांवर तीव्र विरोध करण्यात आला आहे. सार्वजनिक कंपन्यांच्या काही भांडवलदारांना कवडीमोल किंमतीत विक्री, राज्यांच्या अधिकारावर गदा, या मुद्दें बरोबर भविष्यातील आधुनिक तंत्रज्ञान चे मनुष्यबळ तयार करावे लागणार आहेत. 1990 चे आर्थिक बदलानंतर य टेलिकॉम व पेट्रोल या क्षेत्रातील सत्ता काही उद्योजकांच्या हाती गेली आहे .महागाईमुळे देशात महामंदी येईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली असून राज्य केंद्राकडून राज्याला कायम सापत्न वागणूक दिली जात असल्याचे ही ते म्हणाले.